राज्यातील महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून उघडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 07:34 AM2022-01-26T07:34:10+5:302022-01-26T08:08:42+5:30
मान्यता दिल्यानंतर विभागाने आदेश काढला आहे.
मुंबई : राज्यातील विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांमधील वर्ग १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. यासंदर्भातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
मान्यता दिल्यानंतर विभागाने आदेश काढला आहे.
सर्व अकृषी विद्यापीठे, संलग्न महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, समूह विद्यापीठे, तंत्रनिकेतने व अन्य शैक्षणिक संस्थांमधील वर्ग १ फेब्रुवारीपासून ऑफलाइन सुरू होतील. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर हे वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय विभागाने घेतला होता. तथापि, राज्यातील शाळा 24 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. विद्यापीठ व महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनास विचारुनच घ्यावा, असेही आदेशात म्हटले आहे. तसेच, विद्यापीठे, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत विद्यापीठांनी त्यांच्या स्तरांवर निर्णय घ्यावा, असेही आदेशात म्हटले आहे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन विद्यापीठाने हेल्पलाईन जारी करावी. तसेच, विद्यापीठाच्या वेबसाईटवर परीक्षांसंदर्भात नमुना प्रश्नसंच, मार्गदर्शन सूचना आणि अभ्यासक्रम प्रकाशित करावा, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.