मुंबई विद्यापीठ; ऑनलाइन परीक्षांच्या पार्श्वभूमीवर निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून हिवाळी सत्र परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेल्या एकूण शुल्कापैकी २५ टक्के रक्कम ही महाविद्यालयांना देण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांनी शुल्क परतावा प्रक्रिया सोपी व्हावी यादृष्टीने परीक्षांसाठी विद्यापीठात भरलेल्या शुल्कसंबंधीची माहिती विद्यापीठाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना काळात मागील वर्षीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांप्रमाणेच विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आणि त्यासाठी वाणिज्य, कला, विज्ञान या पारंपरिक शाखांच्या महाविद्यालयांची पदवी, पदव्युत्तर क्लस्टर महाविद्यालये अशी विभागणी केली. लीड महाविद्यालयांनी परीक्षांची नियोजनाची तयारी केली. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देणे शक्य नाही त्यांना पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी क्लस्टर महाविद्यालयांवर सोपविली. सोबतच प्रात्यक्षिक, प्रकल्प, मौखिक परीक्षाही ऑनलाइन घेण्यात आल्या.
या सर्व परीक्षांचे आयोजन करण्यासाठी साधन, सुविधा, प्रक्रिया, यंत्रणा, त्यांचे मानधन या साऱ्यांचा खर्च महाविद्यालयांना मोठ्या प्रमाणावर आला. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने त्यांना शुल्काची काही रक्कम प्रतिपूर्ती म्हणून देण्याचा निर्णय घेतला.
* उन्हाळी सत्र परीक्षा सुरळीत सुरू
ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी विविध टप्प्यांवर नियोजन करणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या सत्र ६च्या परीक्षा सुरळीत सुरू झाल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाने ९४ समूह महाविद्यालयाद्वारे नियोजन केले आहे. त्यासाठीची महत्त्वाची जबाबदारी समूह महाविद्यालयांवर असून तब्बल ४५० पेक्षा जास्त महाविद्यालयात ऑनलाइन परीक्षा सुरळीत सुरू असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.
.........................................................................