Join us

सीएसएमटी स्थानकात लोकलची टक्कर टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 6:12 AM

या गोंधळामुळे गाड्या उशिराने धावत होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. 

मुंबई  : लोकल वाहतुकीसाठी अतिशय वर्दळीचे समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात गुरुवारी मोठा अनर्थ टळला. सीएसएमटी स्थानकात येत असलेल्या कल्याण-सीएसएमटी लोकलने सिग्नल चुकविल्याने ती फलाट क्रमांक चारवर आली. मात्र, समोर दुसरी गाडी उभी असल्याचे दिसताच मोटरमनने लगेचच ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली. या गोंधळामुळे गाड्या उशिराने धावत होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. 

नियम सांगतो...नियमानुसार, सिग्नल डाव्या बाजूला असणे गरजेचे आहे. मात्र मुंबई विभागातील सिग्नल यंत्रणा गुंतागुंतीची असल्यामुळे सिग्नल पास होण्याच्या घटना घडत आहेत. हा सिग्नलही तसाच पास झाला आहे. मोटरमनने ट्रेन स्थानकाजवळ पोहोचत असताना त्याचा सिग्नल समजून शेजारील सिग्नल पाहिल्याने ही घटना घडली असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका मोटरमनने सांगितले.

नेमके काय झाले? कल्याण-सीएसएमटी लोकल दुपारी सव्वा तीनच्या सुमारास सीएसएमटी स्थानकाकडे आली.  फलाट क्रमांक तीनकडे जाण्याचा या गाडीला सिग्नल देण्यात आला होता. गाडी सिग्नल चुकवून फलाट क्रमांक चारकडे गेली.

फलाटावर गोंधळ अप दिशेची गाडी फलाट क्रमांक तीनकडे न जाता चारकडे जात असल्याचे दिसताच गोंधळ उडाला. कल्याण-सीएसएमटी गाडीच्या मोटरमनने तातडीने ब्रेक लावला. त्यावेळी फलाट क्रमांक चारवर ठाण्यावरून आलेली गाडी लागली होती.  दुपारी ३ वाजून २० मिनिटाच्या सुमारास हा प्रकार घडला. ४० मिनिटे हा गोंधळ सुरू होता.

दुर्घटना टळली, पुढे? चुकीच्या फलाटावर गेलेली लोकल मागे घेऊन पुन्हा फलाट क्रमांक ३वर आणण्यात आली.  मोटरमनला फलाटावर उतरवून चौकशीसाठी नेण्यात आले. गार्डचीही चौकशी होणार आहे.  सिग्नल चुकविणारी लोकल नंतर कारशेडमध्ये रवाना करण्यात आली. या घटनेमुळे अप-डाउन धिम्या मार्गावरील वाहतूक खोळंबली. 

टॅग्स :मुंबई लोकल