Join us

सर्वच प्रभागांत रंगणार कांटे की टक्कर

By admin | Published: February 14, 2017 4:41 AM

गेली २५ वर्षे युती असलेल्या शिवसेना-भाजपाने एकमेकांपासून यंदा फारकत घेतली तर आघाडीमध्येही फाटाफूट झाल्याने महापालिका निवडणूक चांगलीच रंगतदार

मुंबई : गेली २५ वर्षे युती असलेल्या शिवसेना-भाजपाने एकमेकांपासून यंदा फारकत घेतली तर आघाडीमध्येही फाटाफूट झाल्याने महापालिका निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार आहे. त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लागल्याने उमेदवारांवरही कोणत्याही परिस्थितीत जागा जिंकण्याची जबाबदारी आली आहे. महापालिकेच्या ‘एन’ वॉर्डमध्येही असेच चित्र आहे. सेनेच्या बंडखोरांविरुद्ध सेनेचे उमेदवार तर काही ठिकाणी भाजपाविरुद्ध सेना, काँग्रेस अशी लढत होणार आहे.‘एन’ वॉर्डमधील प्रभाग १२३ महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे शिवसेनेने डॉ. भारती बावदाने यांना उमेदवारी दिली आहे. मात्र ही उमेदवारी आपल्या भावजयीला मिळावी, यासाठी सेनेचे माजी नगरसेवक आणि विधानसभेच्या निवडणुकीत अवघ्या पाचशे-हजार मतांनी भाजपाकडून पराभूत झालेले सुधीर मोरे यांनी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला. मात्र त्यांची मागणी मान्य न करता शिवसेनेने भारती बावदाने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पक्षावर नाराज झालेल्या मोरे यांनी त्यांची भावजय स्नेहल मोरे यांना १२३मधूनच अपक्ष म्हणून उभे केले आहे. मोरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या राम कदम यांना ‘कांटे की टक्कर’ दिल्याने या प्रभागातील मते त्यांच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे. तर बावदाने २०१२च्या निवडणुकीत याच प्रभागातून विजयी झाल्या होत्या. त्यामुळे या प्रभागात शिवसेनेविरुद्ध सेनेचे बंडखोर असे चित्र असणार आहे.प्रभाग क्रमांक १२५मध्ये एका बाजूला उच्चभ्रू वस्ती तर दुसरीकडे झोपडपट्टी. त्यामुळे भाजपा आणि सेनेमध्ये सामना रंगणार आहे. १२५ प्रभागही महिलांसाठी राखीव असल्याने मनसेतून निवडून आलेले व शिवसेनेत प्रवेश घेतलेले सुनील आवळे यांच्या पत्नी रूपाली आवळे यांना सेनेने उमेदवारी दिली. तर दुसरीकडे १४ वर्षे आमदार प्रकाश मेहता यांचे पी. ए. म्हणून कामकाज पाहिलेले सचिन पवार यांच्या पत्नी साक्षी पवार यांना भाजपातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. रमाबाई आंबेडकरनगरमध्ये राहणारे आवळे यांना तेथील मतदारांनी २०१२ला कौल दिला असला तरी सचिन पवार यांचा अवघ्या ५०० मतांनी निवडणुकीत पराभव झाला होता. या प्रभागात मराठी समाजाबरोबरच गुजराती समाजही बहुसंख्य असल्याने या प्रभागातून निवडून येण्यासाठी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये चुरस आहे. प्रभाग क्रमांक १३१मध्ये तिरंगी लढत असणार आहे. पक्षाच्या नव्हे, तर स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादीच्या राखी जाधव, भाजपामधून सेनेत आलेले मंगल भानुशाली आणि भाजपाचे मुंबई प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांच्यात हा प्रभाग जिंकण्यासाठी चुरस असणार आहे. पण यंदा राखी यांना नव्या प्रभागाचा झटका बसला आहे. तर २०१२मध्ये भाजपातर्फे निवडून आलेले मंगल भानुशाली यांनी सेनेत प्रवेश केल्याने सेनेलाही ही जागा जिंकण्याची तेवढीच अपेक्षा आहे. या चढाओढीत मागे पडू नये म्हणून भाजपानेही तेवढीच ताकद पणाला लावत मुंबईचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनाही या प्रभागातून उमेदवारी दिली. (प्रतिनिधी)