मुंबई : सोनोग्राफी, गर्भावस्थेदरम्यानची सोनोग्राफी, हृदयाची वा रक्तवाहिन्यांची तपासणी अशा महत्त्वपूर्ण वैद्यकीय तपासण्या करण्यासाठी ‘कलर डॉप्लर यंत्रां’ची आवश्यकता असते. यापूर्वी अशा तपासण्यांसाठी उपनगरीय रुग्णालयातील वा प्रसूतिगृहातील गरजूंना प्रमुख रुग्णालयात यावे लागायचे, यामध्ये रुग्णांना प्रवासाची दगदग होण्यासोबतच अधिक वेळदेखील लागत असे. या सर्व बाबी लक्षात घेऊन आता महापालिकेने प्राधान्याने उपनगरीय रुग्णालयांसाठी व प्रसूतिगृहांसाठी अत्याधुनिक स्वरूपाची ४४ कलर डॉप्लर यंत्रे घेणाचे प्रस्तावित केले आहे. लवकरच याबाबतची निविदा व खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन या वर्षी ही यंत्रे मुंबईकरांच्या सेवेत रुजू होतील.‘कलर डॉप्लर यंत्रा’मुळे सोनोग्राफी, गर्भावस्थेतील सोनोग्राफी, रक्त वाहिन्यांमधील अडथळे शोधण्याबाबतच्या तपासण्या, हृदयाची ‘टू डी इको’ तपासणी यासारख्या वेगवेगळ्या तपासण्या त्वरित अचूकपणे करून त्याआधारे सुयोग्य निदान व आवश्यक ते औषधोपचार करणे वैद्यकीय तज्ज्ञांना शक्य होते.अत्याधुनिक स्वरूपाच्या ४४ कलर डॉप्लर मशिन्स महापालिका घेणार आहे. हे प्रत्येक यंत्र पॅक्स या उपकरणास जोडणे शक्य असणार आहे. ज्यामुळे इंटरनेट जोडणी शक्य होऊन डॉप्लरद्वारे प्राप्त होणारे अहवाल इंटरनेटच्या मदतीने जगभरात कुठेही त्वरित पाठविणे शक्य होणार आहे. यामुळे एखाद्या गुंतागुंतीच्या प्रकरणी संबंधित विषयातील तज्ज्ञांचे अभिप्राय घेणे सुलभ होणार आहे. तसेच संबंधित अहवाल इंटरनेटच्या आधारे महापालिकेच्या इतर रुग्णालयात पाठविणेदेखील शक्य होणार असल्याने गरजू रुग्णाला पूर्वीच्या तुलनेत अधिक लवकर आवश्यक ते वैद्यकीय उपचार मिळणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर आणीबाणी प्रसंगी तातडीच्या उपचारांसाठी दाखल असणाऱ्या रुग्णांच्या ‘गोल्डन पिरियड आॅफ इमर्जन्सी’बाबत अधिक सुयोग्य नियोजन करणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)
पालिका रुग्णालयांत ‘कलर डॉप्लर’
By admin | Published: January 10, 2017 7:13 AM