जयंत होवाळ
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या मुंबई महापालिकेवर चांगलेच लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. मुंबईतील स्वच्छतेबाबत ते महापालिका प्रशासनाला सातत्याने सूचना करत असून प्रशासनही लगबगीने कामाला लागत आहे. मुंबईतील स्वच्छतेनंतर महापालिकेच्या स्वच्छता कामगार वसाहतीत चांगल्या सुविधा पुरवण्याचे आदेश त्यांनी कालच दिल्यानंतर आयुक्तांनी विभागीय पातळीवर कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
शिंदे यांनी २ ऑक्टोबर रोजी स्वच्छता कामगारांच्या कासारवाडी आणि गौतमनगर वसाहतींना अचानक भेट देऊन या वसाहतींना सुविधा पुरवण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मंगळवारी सर्व संबंधित खात्यांची बैठक घेतली. बैठकीस सर्व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांच्यासह संबंधित सहआयुक्त, उप आयुक्त, २४ विभागांचे सहायक आयुक्त, खातेप्रमुख उपस्थित होते.
आयुक्तांनी काय सांगितले बैठकीत?
स्वच्छता कामगारांच्या सर्व ४४ वसाहतींमधील नागरी सेवा- सुविधांचा आढावा घ्यावा.
खड्डेमुक्त आणि स्वच्छ रस्ते, पुरेसा पाणीपुरवठा, मलनि:सारणाच्या योग्य सोयी तसेच वाहिन्यांचे मजबुतीकरण, घनकचरा व्यवस्थापन, दिवाबत्ती, कीटकनाशक फवारणी, मनोरंजन व आरोग्याच्या दृष्टिने उद्यान, सार्वजनिक प्रसाधनगृहे व त्यांची नियमित स्वच्छता, करावी. हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची सुविधा, कामगारांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची निर्मिती तसेच नजीकच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र कार्यान्वित करा.
कामगारांच्या मुला-मुलींच्या शैक्षणिक उन्नतीसाठी महानगरपालिका राबवित असलेल्या विविध योजना, शिष्यवृत्ती यांचा योग्य तो लाभ मिळवून द्यावा.
प्रारंभी कासारवाडी आणि गौतमनगर वसाहतींचा कृती आराखडा तयार करावा, त्याच धर्तीवर इतर वसाहतींचे मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी आराखडा तयार करावा.