एकोपा आणि जिव्हाळ्याचा उत्तम आदर्श असलेली वसाहत

By admin | Published: January 1, 2016 04:23 AM2016-01-01T04:23:33+5:302016-01-01T04:23:33+5:30

ब्रिटिशांनी १९२४ साली कैद्यांसाठी बांधलेल्या तुरुंगाचे रूपांतर आज डिलाईल रोडवासीयांनी एका सुंदर वसाहतीत केले आहे. सिमेंट आणि लोखंडापासून बांधलेल्या इमारतींची वास्तू आज

The colony of holistic ideal of ecstasy and intimate | एकोपा आणि जिव्हाळ्याचा उत्तम आदर्श असलेली वसाहत

एकोपा आणि जिव्हाळ्याचा उत्तम आदर्श असलेली वसाहत

Next

ब्रिटिशांनी १९२४ साली कैद्यांसाठी बांधलेल्या तुरुंगाचे रूपांतर आज डिलाईल रोडवासीयांनी एका सुंदर वसाहतीत केले आहे. सिमेंट आणि लोखंडापासून बांधलेल्या इमारतींची वास्तू आज ढासळायला आली असली, तरी त्यात राहणाऱ्या रहिवाशांच्या तीन पिढ्यांनी या ठिकाणी आपापसांत निर्माण केलेला जिव्हाळा अतूट आहे.
करी रोड पश्चिमेकडील ना.म. जोशी मार्गावर असलेल्या डिलाईल बीडीडी चाळीमध्ये एकूण ३२ इमारती आहेत. तळमजला अधिक तीन मजल्याच्या या प्रत्येक चाळीत दरमजल्यावर २० खोल्यांप्रमाणे एकूण ८० खोल्या आहेत. अशा प्रकारे संपूर्ण वसाहतीत एकूण २ हजार ५६० कुटुंबे राहतात. वसाहतीच्या देखरेखीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींसोबत स्थानिक समस्येपासून पुनर्विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी रहिवाशांचे नेतृत्व डिलाईल रोड बीडीडी चाळ उपक्रम सेवा समिती करते.
उपक्रम सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी सांगितले की, संपूर्ण वसाहतीत प्रत्येक इमारतीमध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात. मात्र गणेशोत्सव, नवरात्रौत्सव आणि रामनवमीसाठी संपूर्ण वसाहत एकाच ठिकाणी जमते. ना.म. जोशी मार्ग सार्वजनिक उत्सव मंडळ गेल्या ६० वर्षांहून अधिक काळापासून वसाहतीचे नेतृत्व करत आहे. या मंडळामार्फत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवात संपूर्ण वसाहत सामील होते. दोन्ही सणांसाठी मंडळ एकदाच वार्षिक वर्गणी काढते. वसाहतीमधील काही इमारतींमध्ये छोटी-छोटी मंडळे असून, ती नवरात्रौत्सव आणि गणेशोत्सव साजरा करतात. मात्र इमारतीमधील उत्सव साजरा करतानाच सर्व कार्यकर्ते वसाहतीच्या सार्वजनिक उत्सवातही सामील होत असतात.

देशात असहिष्णुतेचे वातावरण असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून समाजात सुरू आहे. मात्र मुंबईत गेल्या ९५ वर्षांपासून हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध अशा विविध धर्मांचे लोक एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने एका वसाहतीत नांदताना दिसत आहेत. दिवाळी असो की ख्रिसमस, ईद असो वा गणेशोत्सव, इथे सर्वच सण खेळीमेळीने साजरे केले जातात. देशातील विविधतेचे दर्शन घडवणाऱ्या या वसाहतीमधील प्रत्येक रहिवाशाने वसाहतीलाच कुटुंब मानले; आणि म्हणून सर्वगुण संपन्न म्हणून वसाहतीची ओळख निर्माण झाली आहे. या कुटुंबाप्रमाणे उभारलेल्या वसाहतीचे नाव आहे डिलाईल रोड बीडीडी चाळ.

सामाजिक भान जपताना : नुकत्याच पार पडलेल्या दत्त जयंतीनिमित्त येथील सत्यम् क्रीडा मंडळाने चार दिवसीय उत्सवाचे आयोजन केले होते. दुष्काळग्रस्तांना मदत व्हावी म्हणून उत्सव काळात एक दानपेटी या ठिकाणी ठेवण्यात आली होती. संपूर्ण वसाहतीने उत्सवात सामील होत केलेल्या दानामुळे ५१ हजार रुपयांचा निधी जमा झाला. लवकरच या निधीचा धनादेश ‘नाम’ फाउंडेशनला दिला जाईल, असे समितीचे सदस्य अशोक इंजल यांनी सांगितले.

उत्सवांचा महापूर : वसाहतीत विविध धर्मांचे लोक एकोप्याने राहत असल्याने या ठिकाणी बाराही महिने उत्सवांची धूम असते, अशी माहिती उपक्रम समितीचे सदस्य आॅल्विन शेराव यांनी दिली. त्यांनी सांगितले की, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, ईद, ख्रिसमस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, दत्त जयंती असे सर्वच सण-उत्सव वसाहतीमधील सर्वधर्मीय एकत्रित येऊन साजरे करतात. त्यामुळे बीडीडी चाळीत उत्सवांचा महापूर वाहत असतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

दिग्गज खेळाडूंची फॅक्टरी : ललित कला भवन हे एकमेव खेळाचे मैदान वसाहतीमध्ये असल्याची माहिती उपक्रम समितीचे सदस्य ज्ञानेश्वर तेजम यांनी दिली. ते म्हणाले की, या मैदानातून वसाहतीने अनेक नामवंत खेळाडू निर्माण केले आहेत. त्यात कबड्डीपट्टू सुनील जाधव, सीताराम साळुंखे, बाजीराव होडगे, विनायक अत्याळकर, रामचंद्र जाधव, कॅरमपटू महेंद्र तांबे, टेबल टेनिसपटू महेंद्र चिपळूणकर यांचा समावेश आहे. यातील काही खेळाडूंनी जिल्हा स्पर्धा गाजवल्या आहेत, तर काहींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्व केले आहे.

कचरामुक्तीच्या दिशेने : वसाहतीमधील स्वच्छतेकडे समिती अधिक लक्ष देत आहे. त्यासाठी प्रशासनाचे सफाई कामगारही मदत करत आहेत. सकाळी ८.३० वाजता आणि दुपारी ३.३०नंतर असे दिवसातून दोनवेळा वसाहतीत घंटागाडी कचऱ्याचे संकलन करते; शिवाय प्रत्येक इमारतीबाहेर कचऱ्याचा डबा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात स्वच्छता राखण्यात समितीला यश येऊ लागले आहे, असे समितीचे सदस्य प्रमोद बागवे यांनी सांगितले.

Web Title: The colony of holistic ideal of ecstasy and intimate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.