मुंबई : विमा कंपन्यांच्या एजंटकडून विमा पाँलिसी घेताना अनेक जण प्रिमियमची रक्कम आणि परतावा या दोन बाबी तपासतात. मात्र, प्रत्यक्षात या पाँलिसीचा उपयोग करण्याची वेळ येते त्यावेळी त्यातील अनेक छुप्या अटी शर्थींमुळे विमाधारक अपेक्षित फायद्यापासून वंचित राहतो. ही फसगत संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी आणि विमा पाँलिसींच्या क्लिष्टतेला पूर्णविराम देण्यासाठी पाँलिसींना कलर कोडींग करण्याचा निर्णय इन्शुरन्स रेग्युलेटरी अँण्ड डेव्हलपमेंट अथाँरीटी आँफ इंडियाने ( आयआरडीएआय ) घेतला आहे.
विमा पाँलिसी हिरव्या, लाल आणि नारंगी रंगात देण्याचा आयआरडीएचा विचार आहे. या नव्या धोरणाचा मसुदा बुधवारी आयआरडीएआयने प्रसिध्द केला असून त्यावर १५ आँक्टोबरपर्यंत आपल्या हरकती सूचना विमा कंपन्यांना सादर करायच्या आहेत. त्यानंतर या धोरणाला अंतिम स्वरुप दिले जाणार आहे. ज्या पाँलिसी सर्वसामान्यांना समजण्यासाठी सुकर असतील नियमावलींची जास्त क्लिष्टता नसेल त्यांना हिरवा रंग दिला जाणार आहे. नारंगी रंगाच्या पाँलिसी या समजण्यासाठी थोड्या किचकट असतील. तर, सर्वसामान्यांच्या आकलनापल्याडच्या तसेच अनेक अटी शर्थी आणि फायद्या तोट्यांची लांबलचक नियमावली असलेल्या पाँलिसींना लाल रंग दिला जाणार आहे. विमा कंपन्यांनी या पध्दतीचा कलर कोडनुसारच आपल्या पाँलिसी वेबसाईटवर प्रसिध्द कराव्यात असे बंधन घातले जाणार आहे. सामूहिक स्तरावरील पाँलिसी या संस्थात्मक पातळीवर काढल्या जात असल्याने त्याची बारकाईने पडताळणी होत असते. त्यामुळे त्यांना अशा पध्दतीच्या कलर कोडींगची गरज नसल्याचे आरआयडीएआयचे म्हणणे आहे.
सात निकषांवर ठरणार रंग : पाँलिसीतले पर्यायी कव्हर, को पेसाठी टक्केवारी, वेटिंग कालावधी, कोणत्या प्रकारच्या उपचारांसाठी पाँलिसी आहे, त्यांच्या खर्चाच्या मर्यादा किती आहे, कोणत्या स्परुपाच्या खर्चाचा परतावा मिळणार नाही आणि अन्य अटी शर्थी असे या कलर कोडींगसाठी सात वेगवेगळे निकष ठरवून देण्यात आले आहेत. प्रत्येसाठी १४.२८ गुण असतील. त्या आधआरे प्रत्येक पाँलिसीला शून्य ते सात पाँईंट दिले जातील. दोन पेक्षा कमी पाँईंट असल्यास पाँलिसीला हिरवा, दोन ते चारसाठी नारंगी आणि चार ते सहा साठी लाल असे रंग ठरविण्यात आले आहेत.