मुंबई - चित्रकार दीपक पाटील यांचे ' हार्मनी इन ह्यूज ' हे चित्र प्रदर्शन ७ जानेवारी २०२४ पर्यंत जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा येथे आयोजित करण्यात आले आहे. दीपक पाटील वास्तववादी शैलीत चित्रण करतात. अनेक वर्षांच्या साधनेमुळे त्यांचे वास्तववादी चित्रणावर प्रभुत्व आहे, त्यामुळे त्यांची चित्रे रसिकांना मंत्रमुग्ध करतात.
वास्तववादी चित्रण आणि निसर्गचित्रे ही पाटील यांची खासियत असली तरी मिक्स मीडिया आणि जलरंगावर त्यांनी प्रभुत्व मिळवले आहे. अनेक वर्षे पाटील हे वाळू या अनोख्या माध्यमाचा कॅनव्हासवर मिश्र माध्यमात वापर करून चित्रण करतात. वाळू हे माध्यम वापरण्यासाठी कठीण असते. या माध्यमावर वास्तववादी चित्रातले सूक्ष्म तपशील दाखवणे हे अत्यंत कठीण काम आहे. केवळ मिश्र माध्यमच नाही तर जलरंगासारख्या अवघड माध्यमावरही पाटील यांचे प्रभुत्व आहे. निसर्गाने समृद्ध आणि आध्यात्मिक महत्व असलेल्या हिमालयातील परिसराचे सौन्दर्यपूर्ण चित्रण पाटील यांनी जलरंग माध्यमात अतिशय सुरेख पद्धतीने केले आहे.
या प्रदर्शनात तैलरंग, ॲक्रीलिक रंग, जलरंग या माध्यमांचा वापर करून पाटील यांनी राजस्थानी लोकजीवन कॅनव्हासवर चित्रित केले आहे. राजस्थान हा वालुकामय कोरडा प्रदेश असल्याने त्या प्रदेशाचे वैशिष्ट्यही त्यांच्या चित्रामध्ये उतरले आहे. चित्रकलेतील हा एक अनोखा प्रयोग कला रसिकांना खूप आवडला आहे. माध्यमांच्या नावीन्यतेबरोबरच पाटील यांच्या चित्रामधील सूक्ष्म बारकावे, आकर्षक रंगसंगती, आर्किटेक्चर, मानवी आकारांमधील प्रमाणबद्धता कला रसिकांना थक्क करून सोडते.
मुंबईमध्ये त्यांनी 'सिल्वरटुन', 'क्रेस्ट', 'इल्युजन' अशा ॲनिमेशन स्टुडिओमध्ये काम केले आहे. दिल्लीमध्ये 'एस्कॉटुन' मधून 'किंग' सारख्या सिरीयल आणि अनेक प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. २००७ पासून पाटील पूर्ण वेळ चित्रकलेसाठी देत आहेत. संस्कार भारती या संस्थेसोबत त्यांनी स्पॉट लँडस्केप काम केले आहे. ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, विजय आचरेकर यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले आहे. त्यांच्या चित्रांना अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय पारितोषिके मिळाली आहेत.