मुंबई : मरिन ड्राइव्ह येथील पथदिव्यांच्या रंगावरून शिवसेना-भाजपात सुरू झालेली रस्सीखेच अजूनही थांबण्याची चिन्हे नाहीत. आता आम्ही रंगाचे राजकारण करत नाही तर आमचे मित्रच रंगाचे राजकारण करतात, अशा शब्दांमध्ये मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी बुधवारी शिवसेनेला फटकारले आहे. मुंबईत एलईडी दिवे लागायला हवेत, ही भाजपाची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मरिन ड्राइव्ह येथील एलईडी दिव्यांवरून शिवसेना आणि भाजपात वर्षभर तणातणी सुरू आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार २६ जानेवारीपर्यंत मरिन ड्राइव्हवर पूर्वीप्रमाणे पिवळ्या रंगाचे दिवे बसविण्याची मागणी शिवसेनेने केली होती. दिवे बसवा अन्यथा पायउतार व्हा, असा इशाराही शिवसेनेने पालिका आयुक्तांना दिला होता. त्यानुसार दिवे बदलण्याचे काम सुरू झाले असून पहिल्या दिवशी २५० दिवे बसविण्यात आले. लवकरच उर्वरित दिवे बसविले जाणार असून त्यामुळे मरिन ड्राइव्हला पुन्हा एकदा सोनेरी झळाळी मिळणार आहे. यावर बोलताना शेलार यांनी शिवसेनेवर दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप केला. मुंबईत एलईडी दिवे लागायला हवेत ही आमची भूमिका आहे. पिवळे की सफेद रंग या वादात आम्ही पडलो नाही. शिवसेनेच्याच मंत्र्यांनी वांद्रे-वरळी सी-लिंकवरील पिवळे दिवे काढून तेथे पांढरे दिवे लावले आहेत. त्यामुळे रंगाचे राजकारण कालबाह्य झाले आहे. ते आमचे मित्र करत आहेत. आम्ही तंत्रज्ञानाचा पुरस्कार करत आहोत, असा दावा शेलार यांनी केला. मरिन ड्राइव्हवर पुन्हा एकदा पिवळे दिवे बसविण्यात आले यात जय-पराजयाचा विषय येत नाही. सोडियम व्हेपरचे दिवे लावण्याची मागणी करणारे आला एलईडी दिवे लावायला तयार झाले आहेत, असा टोलाही शेलार यांनी लगावला. जानेवारी २०१५ मध्ये शिवसेना आणि स्थानिकांच्या विरोधानंतरही भाजपाने मरिन ड्राइव्ह येथे एलईडी दिवे बसविण्याचा प्रकल्प रेटून नेला. त्यासाठी आशिष शेलार यांनी पुढाकार घेतला होता. एलईडी दिव्यांमुळे मरिन ड्राइव्हची सोनेरी झळाळी हरविल्याने स्थानिकांनी न्यायालयात धाव घेतली. मरिन ड्राइव्हची रया जाईल असे काहीही करू नका, अशी तंबी देत न्यायालयाने पूर्वीप्रमाणे पिवळे दिवे लावण्याचे निर्देश दिले होते.