मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती व उद्यानात (राणीबाग) साडेपाच हजार चौरस फूट जागेत सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच काचेच्या बोगद्यातून (टनेल) देशी-विदेशी रंगीबेरंगी माशांसह पेंग्विनची धमाल, बागडणे अनुभवता येणार आहे.
भायखळा येथील राणीबागेला भेट देण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे उद्यान व प्राणिसंग्रहालय पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. या प्राणिसंग्रहालयात २५ पेंग्विन, दोन वाघ, हत्ती, हरणे, माकडे, तरस आदी प्रकारचे १३ जातींचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातीचे १५७ पक्षी आहेत. याशिवाय २५६ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत. त्यामुळे बच्चे कंपनीसह मोठ्यांचीही राणीबाग आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय -
आता सिंगापूर, पुबईच्या धर्तीवर साडेपाच हजार चौरस फूट जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. यात एक टनेल १४ मीटर तर, दुसरे ३६ मीटर लांब असणार आहे. यासाठी मुंबई महापालिका ६० कोटी रुपये खर्च करणार असल्याचे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.
सुट्टीच्या दिवशी ४० हजार पर्यटक -
१) राणीबागेत दररोज ७ ते ८ हजार पर्यटक भेट देतात. सणासुदीच्या काळात, सार्वजनिक सुटी व शनिवार-रविवारी, तर पर्यटकांचा आकडा ३५ ते ४० हजारांपर्यंत जातो.
२) देशभरातील पर्यटकांबरोबरच विदेशी पर्यटकही या ठिकाणला भेट देतात. पेंग्विनला पाहण्यासाठी आणखी मोकळी जागा
३) गेल्या ८ वर्षांत पेंग्विनची संख्या २५ पर्यंत पोहोचली आहे. पेंग्विनसाठी सध्या २२५ चौरस मीटर जागा उपलब्ध आहे; परंतु पेंग्विनची संख्या वाढत असल्याने त्यांना जागा अपुरी पडू लागली आहे.
४) त्यांच्या कक्षाशेजारी उपलब्ध जागेत ६० चौरस मीटरने वाढ केली जाणार आहे. त्यामुळे आता पेंग्विनसाठी २२५ चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे.