Join us

बालभारतीच्या कवितांचा धमाल आविष्कार; शिवाजी मंदिरात रंगणार कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 1:31 PM

कार्यक्रमातील निवेदन, गायन, वाचन, नृत्य इथपासून ते वाद्यवृंदाची जबाबदारही 30 मुलांनी घेतली आहे

मुंबई - बालभारतीच्या अनेक कविता आजही कानावर पडल्या तर आबालवृध्दांना शाळेतील बाकावर नेऊन बसवितात. अशा निवडक 30 हून अधिक कवितांचे विद्यार्थ्यांसमोर नाटय़, गायन, वाचन, नृत्य स्वरुपात सादरीकरण झाले तर त्यांना दप्तराचे ओझे वाटणारी पुस्तके हकली वाटू लागतील आणि या नव्या मित्रांशी विद्यार्थ्यांची मैत्री जमेल. या उद्देशाने बालरंगभूमीवर काम करणाऱ्या गंधार या संस्थेने बालभारतीच्या पहिली ते दहावीच्या पुस्तकातील कवितांचा बच्चेकंपनीसाठी धमाल रंगमंचिय आविष्कार रंगभूमीवर आणला आहे. 

या कार्यक्रमातून येणारा निधी हा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला जाणार आहे. या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग 17 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11.00 वा. दादर येथील शिवाजी मंदिर येथे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार, आमदार संजय केळकर, अशोक हांडे, अभिनेते विजय गोखले, नाटककार प्रदीप ढवळ यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर 25 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11.00 वा. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे महापौर मिनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या कवितांचा आनंद मिळावा या दृष्टीने या कवितांचे नाटय़, गायन, वाचन, नृत्य या स्वरुपात सादरीकरण करण्याचा विचार लेखक प्रशांत डिंगणकर यांच्या मनात आला आणि ’गंधार’ तर्फे बालभारतीच्या कवितांवर आधारित ’कट्टी बट्टी’ या कार्यक्रमाची निर्मिती होण्यास सुरूवात झाली. या कार्यक्रमाचे लेखन डिंगणकर यांनी केले आहे तर दिग्दर्शन प्रा. मंदार टिल्लू यांचे आहे. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे कार्यक्रमात सर्व बालकलाकार असणार आहेत. कार्यक्रमातील निवेदन, गायन, वाचन, नृत्य इथपासून ते वाद्यवृंदाची जबाबदारही 30 मुलांनी घेतली आहे. या विद्यार्थ्यांना अशोक पत्की, अशोक समेळ, उदय सबनीस, अशोक बागवे, प्रवीण दवणे आदींचे मार्गदर्शन लाभले आहे. 

कार्यक्रमाचे संगीत संयोजन वैभव पटवर्धन, ओमकार घैसार यांनी केले असून नेपथ्य प्रसाद वालावलकर यांचे आहे. प्रकाशयोजना शितल तळपदे, नृत्य सचिन पाटील, वेशभूषा प्रकाश निमकर, रंगभूषा शशिकांत सकपाळ यांनी केली आहे. यानंतर सुट्टी या कट्टीबट्टीचे प्रयोग मुंबई, ठाणे, पुणे येथे होणार असून नफा कमवणे हा उद्देश आमचा नसल्यामुळे शाळा-शाळांपर्यंत पोहचण्याचा आमचा मानस आहे असे या कार्यक्रमाचे निमंत्रक बाळकृष्ण ओडेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :आशीष शेलारविद्यार्थी