मुंबई - राज्य सरकारी आणि महापालिकांच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये होळी उत्सवांनंतर उत्साही जखमी रुग्णांची नेहमीच गर्दी होत असते. होळी आणि दुसऱ्या दिवशी येणारी धुळवड यातून अपघात झाल्याने मुंबईतील तीन प्रमुख रुग्णलायांमध्ये ४३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची प्रत्येकी रुग्णालयात प्रशासनांकडून देण्यात आली. मात्र, यावेळी रंगपंचमीतून बेरंग होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे सर्व रुग्णालयातील अधिष्ठात्यांनी सांगितले. ’बुरा ना मानों... होली है...‘ असे म्हणत रासायनिक रंग उधळल्याने रुग्णालयातील डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांना कामाला लावण्याचे प्रमाण यंदा कमी होते. कानात रंग जाणे, त्वचेला खाज येणे, डोळे चुरचुरणे, घसा-नाकातील तक्रारी घेऊन रुग्ण दाखल दिवसभरात आले. यात मुलांसह प्रौढदेखील होते. त्यांच्यावर तात्पुरते उपाय करुन घरी सोडण्यात येत असल्याचे रुग्णालयातील प्रशासनाकडून सांगण्यात आले. सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत २७ जणांवर उपचार करुन सोडून देण्यात आले असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. यात त्वचेची जळजळ, भांग पिल्याने धुंदी आणि एक रुग्ण अपघातामुळे दाखल करण्यात आला असल्याचे देशमुख म्हणाले. यातील सर्वांवर उपचार करुन सोडून देण्यात आले. तर नायर रुग्णालयात एकूण १३ जण दाखल करण्यात आले. यातील मेडिसीन विभगाात ३, नेत्रचिकित्सा विभागात २, सर्जरीमध्ये ५, आर्थोमध्ये २ तर त्वचा विकार विभगाात १ जण दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. जे जे रुग्णालयात सर्वात कमी रुग्ण दाखल झाले असून पाण्यावरून घसरल्याने एका ४२ वर्षीय पुरुषाला ऑर्थो विभगाात दाखल केले आहे. तर, १३ वर्षाच्या मुलगा ही घसरून पडल्याने त्याच विभगाात दाखल केले आहे. तसेच २५ वर्षाच्या तरुणांच्या कानात रंग गेल्याने नाक-कान-घसा विभागात दाखल करण्यात आले असल्याचे जे जे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान दाखल होणाऱ्यांची नोंद रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले.
बेरंग होण्याचे प्रमाण यंदा घटले; धुळवडीदरम्यान ४३ जण रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 9:20 PM
यावेळी रंगपंचमीतून बेरंग होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे सर्व रुग्णालयातील अधिष्ठात्यांनी सांगितले.
ठळक मुद्दे मुंबईतील तीन प्रमुख रुग्णलायांमध्ये ४३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची प्रत्येकी रुग्णालयात प्रशासनांकडून देण्यात आली. २५ वर्षाच्या तरुणांच्या कानात रंग गेल्याने नाक-कान-घसा विभागात दाखल करण्यात आले असल्याचे जे जे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.कानात रंग जाणे, त्वचेला खाज येणे, डोळे चुरचुरणे, घसा-नाकातील तक्रारी घेऊन रुग्ण दाखल दिवसभरात आले.