Join us

संतोष कर्डक यांचे 'निसर्गरूपम' चित्र प्रदर्शन, नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत पहायला मिळणार निसर्गाचे रंग

By संजय घावरे | Published: June 03, 2024 5:43 PM

४ ते १० जून या काळात आयोजित करण्यात आलेले 'निसर्गरूपम' हे प्रदर्शन कलाप्रेमींसाठी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुले राहिल.

मुंबई - चित्रकार संतोष कर्डक यांच्या जलरंगातील निसर्ग चित्रांचे 'निसर्गरूपम' प्रदर्शन वरळीतील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये भरणार आहे. या प्रदर्शनात कलाप्रेमींना निसर्गाच्या अद्भुत रंगांचे दर्शन घडणार आहे. 

४ ते १० जून या काळात आयोजित करण्यात आलेले 'निसर्गरूपम' हे प्रदर्शन कलाप्रेमींसाठी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुले राहिल. कला शिक्षकाचे कर्तव्य बजावत असतानाच कर्डक यांनी जुन्नरसारख्या नयनरम्य भागातील निसर्गरंग आपल्या कुंचल्याच्या साहाय्याने कागदावर उतरवले आहेत. कर्डक यांना लहानपनापासूनच चित्रकलेची आवड होती. त्यामुळे बी. ए. करतानाच चित्रकला महाविद्यालयामध्ये ए.टी.डी. डिप्लोमाला त्यांनी प्रवेश घेतला. दोन वर्षांचा ए.टी.डी. डिप्लोमा करत असतानाच चित्रकार संजय साबळे यांच्या सानिध्यात कला शिक्षण पूर्ण केले. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्डक यांनी जलरंग कौशल्यपूर्ण रीतीने हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले.

पुढे जुन्नर येथे कला शिक्षक म्हणून नोकरी करताना त्यांनी जलरंगासारख्या अवघड माध्यमातून निसर्गाला आपल्या कुंचल्यात कैद केले. कर्डक यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे ते रोजच्या जगण्यातले साधे विषय कलात्मक रीतीने कागदावर साकारताना देखाव्यातील सौंदर्य जिवंत करतात. 

अकोले भागात बदली झाल्यानंतर कर्डक यांना खऱ्या अर्थाने निसर्ग चित्रणासाठी खूप मोठी संधी प्राप्त झाली. पावसाळ्यामध्ये तेथे वाहणारे धबधबे, पाण्याने तुडुंब भरलेली भातशेती, दऱ्या-खोऱ्या, कोकण-कडे अशा विविध विषयांवर अनेक निसर्गचित्रे कर्डक यांनी रेखाटली आहेत.

टॅग्स :मुंबईकला