बाजार रंगला रांगोळ्यांच्या रंगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 01:03 AM2018-11-01T01:03:55+5:302018-11-01T01:04:20+5:30
पर्यावरणपूरक रांगोळीला पसंती; खरेदीलाही उधाण, भाव २० रुपये किलो
मुंबई : दिवाळीच्या तयारीत कंदील, नवीन कपडे, फटाके यासोबतच रांगोळीलाही महत्त्व आहे़ दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक रांगोळीला अधिक पसंती असल्याचे चित्र बाजारात आहे़ पाण्यावरची रांगोळी, सुलेखन रांगोळी, रेडिमेड रांगोळी असे विविध रांगोळीचे प्रकारही बाजारात उपलब्ध आहेत़ या रांगोळ्या घेण्यासाठीही महिला वर्गाची गर्दी होत आहे.
शहर-उपनगरातील चाळींच्या जागी टॉवर उभारले असले तरीही आजही मध्यमवर्गीय वस्त्यांमधील घराघरांत दरवाजाबाहेरील कोपरा हा रांगोळी रेखाटण्यासाठी राखीव असतो. आता दिवाळीच्या सणासाठी शहर-उपनगरातील बाजारपेठांमध्ये रांगोळी, रंग, साचे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. गेल्या काही वर्षांत रांगोळीच्या रूपांनी कात टाकत आता एक पाऊल पुढे जात पारंपरिक रांगोळ्यांना आधुनिकतेचा साज चढविला आहे.
पूर्वी गेरूने सारवलेल्या चौकोनात खडूचा वापर, पांढऱ्या रंगाच्या रांगोळीचा वापर करीत ठिपक्यांची रांगोळी काढली जायची. त्यात स्वस्तिक, हळद-कुंकू, लक्ष्मीची पावले काढत रांगोळीला सजवले जायचे. तुळशी वृंदावनाजवळ, अंगणात रांगोळी काढत दिवाळीची पहाट होत असे. घाऊक बाजारात रांगोळीचे भाव २० रुपये किलोपासून आहेत. तर रांगोळ्यांच्या रंगांची छोटी छोटी पाकिटे अगदी १० रुपयांपासून मिळत आहेत, यात १०० रुपयांना १२ वेगवेगळ्या रंगांचाही पर्याय आहे. मात्र किरकोळ बाजारात हाच भाव किमान १५ रुपयांपासून सुरू होत आहे.
रांगोळी काढण्याच्या पद्धतीतही बदल झाला असून फुलांची रांगोळी, पाण्यावर तरंगणारी रांगोळी, निसर्ग देखावे, सुलेखन अशा नानाविध प्रकारांनी रांगोळी रेखाटली जात आहे. रंगांमध्येही बदल झाले असून भडक केशरी, गुलाबी, लाल, पोपटी अशा निआॅन रंगांच्या रांगोळीलाही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
चंदेरी, सोनेरी, लाल अशा वेगवेगळ्या रंगांच्या चकमकीचा वापर करीत रांगोळी सजवली जाते. रांगोळीचे रेडिमेड स्टीकर्स उपलब्ध झाल्याने प्रवेशद्वार सुशोभित करण्याचा अजून एक पर्याय उपलब्ध झाला आहे. रांगोळी काढण्यासाठी चाळणी, प्लॅस्टिकचा कोन आदी साहित्य बाजारात सहज उपलब्ध आहे. विविध ठशांच्या वापर करीत ही रांगोळी सजवता येईल.
पारंपारिक ठिपके
ही रांगोळी पारंपरिक पद्धतीची असते. गेरूचा वापर करत चौकोन बनवत त्यावर ठिपके काढावेत किंवा ठिपक्यांच्या कागदाच्या साहाय्यानेही ठिपके काढू शकतो. मग ते ठिपके एकमेकांना जोडत सुंदर रांगोळी काढून घ्यावी. सारवलेल्या गेरूवर पांढºया रंगाची रांगोळी उठून दिसत असल्याने शक्यतो पांढºया रंगाचा वापर करावा.
संस्कारभारतीचा उत्साह
संस्कारभारतीची रांगोळी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ठिकाणी सर्रास काढली जाते. दिवाळीतही तितक्याच उत्साहाने ही रांगोळी काढली जाते. हाताच्या पाचही बोटांचा वापर करून बोटांच्या पकडीतून हळुवारपणे ही रांगोळी काढण्यात येते.
सुलेखनाची पद्धत
विविध ब्रश, पेन, स्केचपेनचा वापर करत कागदावर केली जाणारी कॅलिग्राफी सगळ्यांना परिचित आहे. पण रांगोळीतसुद्धा सुलेखन पद्धतीचा वापर करत रांगोळी काढता येऊ शकते. ‘शुभ लाभ’, ‘शुभ दीपावली’ असे सुलेखन करता येऊ शकेल.
पाण्यावरची रांगोळी
पसरट किंवा खोलगट भांडे आणि कोळशाची पावडर यासाठी आवश्यक आहे. ज्या ठिकाणी रांगोळी काढायची आहे त्या ठिकाणी भांडे ठेवावे. भांड्यात पाणी भरताना काठोकाठ भरू नये. पाण्याला स्थिर होऊ द्यावे. मग पाण्यावर कोळशाची पावडर अलगद पसरावी. कोळशाची पावडर हलकी असल्याने ती पाण्यावर तरंगते. पृष्ठभाग कोळशाच्या पावडरीने भरेल याची खातरजमा करावी. कोळशाची पावडर पसरविताना हातात ग्लोव्हज् घालावेत. भांड्याला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. मग त्यावर आवडीनुसार रांगोळी काढावी. ही रांगोळी केवळ कोळशामुळे पाण्यावर तरंगते.
फुले, फळे व खडूचाही वापर
फुले, फुलांच्या पाकळ्या, झाडांची पाने, दूर्वा यांचा वापर करत पर्यावरणपूरक रांगोळी काढता येईल. खडूचा वापर करत रांगोळीची बॉर्डर काढून घ्यावी.
त्यात रंग भरण्याऐवजी झेंडूची फुले, पाकळ्या, गुलाबाची विविध रंगीत फुले किंवा पाकळ्या, आॅर्किडची फुले, मोगरा, चाफा आदी फुलांचा वापर करत रांगोळी सजवावी. फुलांवर किंचित पाणी शिंपडावे.
ज्यामुळे ती ताजी दिसू लागतात. मात्र जास्त पाणी शिंपडलेल्या फुलांचा वापर केल्यास ती लवकर कोमेजू शकतात.
रेडिमेड रांगोळ्या
कमळ, लक्ष्मीची पावले, गुलाब, स्वस्तिक, हत्ती आदी विविध नक्षीतील प्लॅस्टिकचे रेडिमेड छापे बाजारात उपलब्ध आहेत. आपल्या आवडीनुसार छापे घ्यावेत. विविध रंग भरत सुंदर रांगोळी काढता येऊ शकते. याशिवाय विविध नक्षीकाम असलेले गोलाकार, चौकोनी, पट्टीच्या आकारातील विविध स्टीकर्स बाजारात उपलब्ध आहेत.