‘बर्ड फ्लू’साठी कोंबिंग ऑपरेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 06:00 AM2021-01-12T06:00:09+5:302021-01-12T06:00:27+5:30
राज्यात बर्ड फ्लू शोधण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे ठिकठिकाणी कोंबड्या तसेच गरज पडल्यास माणसांचीही आरोग्य चाचणी घेण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बर्ड फ्लूचा संसर्ग होण्यामध्ये परभणी आघाडीवर असून आतापर्यंत ८४३ कोंबड्यांना बाधा झाली आहे. त्यापाठोपाठ लातूरमध्ये २४० कोंबड्यांना बर्ड फ्लू झाला आहे. बीडमध्ये ११, ठाणे २०, दापोली (रत्नागिरी) ९, अकोला १, गोंदिया व चंद्रपूर प्रत्येकी २, नागपूर ४५, अमरावती ३० तर नाशिकमध्ये २ कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे.
राज्यात बर्ड फ्लू शोधण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे ठिकठिकाणी कोंबड्या तसेच गरज पडल्यास माणसांचीही आरोग्य चाचणी घेण्यात येणार आहे. गावागावांत सर्वे करण्यात येत असून २ बाय २ चे खड्डे खोदून त्यामध्ये सुमारे १८०० पक्षी पुरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्यांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाईही देण्यात येणार आहे.
२००६ मध्येही बर्ड फ्लूचा संसर्ग आढळला होता. राज्यात संसर्ग रोखण्यासाठी सुमारे १९ लाख कोंबड्यांना मारण्यात आले होते. १५ लाख अंडी नष्ट करण्यात आली होती. नंदूरबार, जळगाव या ठिकाणी पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला होता. २००६ मध्ये जगात ५४१ माणसांचा मृत्यू झाला होता मात्र भारतात एकाही व्यक्तीला संसर्ग झाला नव्हता. पोल्ट्री फार्म मालकांना त्यावेळी सरकारने एक कोटी ४३ लाख रुपयांचे अर्थ सहाय्य केले होते तर खाजगी व्यक्तींना २६ लाख रुपयांची भरपाई दिली होती.
अफवा पसरवू नका : मुख्यमंत्री
बर्ड फ्ल्यूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी. माणसांमध्ये या रोगाचे संक्रमण होत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
परभणीत २७ जणांचे घेतले स्वॅब
n परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे बर्ड फ्लूमुळे ८०० कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, आरोग्य विभागाने सोमवारी पोल्ट्रीफार्म चालक व मालक अशा २७ जणांचे स्वॅब नमुने घेतले आहे.
n पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. मुरुंबा गावात आरोग्य विभागाचे पथक गावात ठाण मांडून आहेत.