मुंबई : कोरोनाच्या समस्येमुळे आपण सोशल डिस्टन्सिंंगचा जो उपाय शोधलेला आहे तो आपण करायचाच; पण आपण मनाने एकत्र आले पाहिजे. या कारणास्तव मनाने जवळ येऊ या. हा सद्गुुरूंचा बोध लक्षात घेऊन आपण या आव्हानाला तोंड देऊ या, असे आवाहन सद्गुरू श्री वामनराव पै यांचे सतशिष्य व सुपुत्र श्री प्रल्हाद पै यांनी केले.
महाराष्ट्र दिनानिमित्त जीवनविद्या मिशन या संस्थेने आयोजित केलेल्या ‘चला महाराष्ट्र करूया’ या यु ट्युब लाइव्ह कार्यक्रमात प्रल्हाद पै बोलत होते. हल्ली जी समस्या आपल्यापुढे निर्माण झालेली आहे त्याकडे आपण आव्हान म्हणू पाहू या. या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करून त्यातून यशस्वीपणे आपण बाहेर पडू, असे प्रल्हाद पै म्हणाले.
खरा प्रॉब्लेम, खरी समस्या कुठे आहे? तर मी आणि माझं ! हा रोग, हा विषाणू जगामध्ये प्रत्येकाला जडलेला आहे. सर्व रोगांचं मूळ मी माझं यातच आहे. आज मी आणि माझं यात प्रत्येक धर्म, जात, पंथ, पक्ष, प्रत्येक माणूस अडकलेला आहे. सर्व जण स्वत:च्या अस्तित्वाचाच विचार करत आहेत. विश्वाचा विचार कोण करतच नाही. मी आणि माझं या रोगातून मुक्त व्हायचे असेल तर त्यासाठी एकच लस आहे आणि ती लस म्हणजे सर्व, सर्वांना आणि सर्वांचं! म्हणून विश्वप्रार्थना ही त्यावरची उत्तम लस आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.सर्व शास्त्रज्ञ लस शोधून काढण्यासाठी दिवसरात्र काम करताहेत. हे सर्व असूनही आपण मात्र अजून एकत्र आलेलो नाहीत. आजही पक्ष, प्रांत, राज्य मोठे वाटते. या सर्वांवर मात करून आपण सर्वांनी लहान लहान विचार बाजूला ठेवून राष्ट्रीय ऐक्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वांनी आरोप, प्रत्यारोप न करता एकत्र येऊन राष्ट्रीय ऐक्यातून वैश्विक ऐक्याकडे वाटचाल करायला हवी, असेही प्रल्हाद पै म्हणाले.हजारो श्रोत्यांनी अगदी घरबसल्या या कार्यक्रमाचा लाभ घेतला. कांचन सावंत यांच्या गर्जा महाराष्ट्र माझा या गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ठिकसेन बांदकर परिवार व रवींद्र पंडित यांनी हरीपाठ सादर केला. कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचलन संतोष तोत्रे यांनी केले. जीवन विश्वाला देऊ या हे अप्रतिम व प्रेरणादायी गीत पाहून अक्षरश: सर्व जण मंत्रमुग्ध होऊन गेले. ६० व्या वर्धापन दिनानिमित्त ६० विश्वप्रार्थना जपयज्ञाने कार्यक्रमाची सांगता झाली.