पुढच्या वर्षी लवकर या..!; गणेशमूर्ती विसर्जनासाठी ३२ कृत्रिम तलाव, ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळे सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 12:55 AM2019-09-12T00:55:07+5:302019-09-12T06:45:03+5:30
महापालिकेचे सुमारे हजार ८ कर्मचारी, अधिकारी तैनात
मुंबई : मुंबापुरीत वाजत-गाजत गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर आता आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. आज (गुरुवारी) दहा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असून, यासाठी मुंबई महापालिकेसह उर्वरित प्राधिकरणे सज्ज झाली आहेत. गिरगाव चौपाटीवरील गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिका सर्व सेवा-सुविधांसह सज्ज झाली असून, गिरगाव चौपाटीसह अन्य ६९ विसर्जन स्थळी पूर्वतयारी करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.
गणेश विसर्जनासाठी येणारे वाहन रेतीमध्ये अडकू नये व मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडावे, याकरिता चौपाटीच्या किनाऱ्यावर ८९६ जाड लोखंडी फळ्या ठेवण्यात येतात. या वर्षी विविध गणेश मंडळांच्या विनंतीनुसार अतिरिक्त लोखंडी फळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी ४५ जर्मन तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ६३६ जीवरक्षकांसह ६५ मोटर बोटींचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश विसर्जनापूर्वी भक्तांनी अर्पण केलेले हार, फुले इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी २१८ निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली आहे.
कलशामधील निर्माल्य त्वरित वाहून नेण्यासाठी कॉम्पॅक्टर, मिनी कॉम्पॅक्टर व डंपर असे एकूण २६७ वाहने सर्व विसर्जन स्थळी ठेवण्यात आलेली आहेत. महापालिकेच्या विविध खात्यांतील कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे, तसेच इतर ७८ नियंत्रण कक्ष व ४२ निरीक्षण मनोरे तयार करण्यात आले आहेत. अन्य ठिकाणी ८१ स्वागत कक्ष तयार ठेवण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून ६९ प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्था आहे.
महापालिकेच्या सेवा-सुविधांमुळे अनंत चतुर्दशी दिनीही कृत्रिम तलावांत जास्तीत-जास्त गणेशभक्त गणेशमूर्तींचे विसर्जन करतील, अशी आशा आहे. - विश्वनाथ महाडेश्वर, महापौर, मुंबई महापालिका
विसर्जन दिनी पावित्र्य व मांगल्य जपावे. उत्सवादरम्यान गर्दीच्या ठिकाणी, तसेच विसर्जन प्रसंगी पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी. गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रात करताना समुद्रास येणारी भरती आणि ओहोटी लक्षात घेऊन समुद्रात जावे. जेणेकरून अप्रिय घटना टाळता येतील. - प्रवीण परदेशी, आयुक्त, महापालिका
७१७ दिवे (फ्लड लाइट)
८३ शोधदीप (सर्च लाइट)
८४ फिरती शौचालये
टोइंग वाहने व क्रेन्स
जेसीबी मशिन्स व बुलडोझर
अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहिनासहीत मनुष्यबळाची व्यवस्था
नियंत्रण कक्षामध्ये निष्णात डॉक्टरांसहीत ६५ सुसज्ज रुग्णवाहिकांची व्यवस्था
खोल पाण्यात जाऊ नका
विसर्जनाकरिता प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्या.
अंधार असणाºया ठिकाणी विसर्जनाकरिता जाऊ नका.
पोहण्याकरिता निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नका.
विसर्जन करताना तराफ्यांचा, प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर करा.
नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे श्वसनाचा त्रास जाणवल्यास वैद्यकीय मदत घ्या.
अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका.
लहान मुलांची काळजी घ्या.
विसर्जनावेळी पाण्यात गमबुट घाला.
विनामूल्य तराफ्यांचा किंवा बोटींचा वापर करा.
वेसावे कोळीवाड्याची विसर्जनाची वेगळी परंपरा आहे. येथील मांडवी गल्ली कोळी जमात विसर्जनासाठी सज्ज झाली आहे. पश्चिम उपनगरातील सुमारे १२५ मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन येथे केले जाते. येथील विसर्जनासाठी चार होड्यांचा एक तराफा केला जातो. असे दोन तराफे तयार करण्यात आले असून, येथील विसर्जनावर देखरेख ठेवण्यासाठी खास ४ बोटी तैनात आहेत़