Join us

पुढल्या वर्षी लवकर या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:07 AM

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असल्याच्या धास्तीपोटी यंदाच्या गणेशोत्सवावरही निर्बंधांची मालिका कायम होती. पण तरीही मर्यादित मुखदर्शन, थेट ...

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असल्याच्या धास्तीपोटी यंदाच्या गणेशोत्सवावरही निर्बंधांची मालिका कायम होती. पण तरीही मर्यादित मुखदर्शन, थेट प्रक्षेपण करून ऑनलाईन दर्शन, मिरवणुकींना फाटा देत सावर्जनिक मंडळांनी दक्षता घेतल्याने दिलासादायक वातावरणात साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढील वर्षी लवकर या...’च्या जयघोषात बाप्पाला निरोप देताना, कंठ दाटून आलेला असतानाच कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, हीच प्रार्थना मनोमन करून अवघे गणेशभक्त आज बाप्पाला भावपूर्ण निरोप देत आहेत.

दैनंदिन व्यवहार हळूहळू सुरू झाले असले, तरी सगळी गाडी अजूनही रुळावर आलेली नाही. त्यातच संसर्गाचा मोठा धोका असल्याने सण-उत्सवांच्या काळात कमालीची जागरुकता ठेवावी, म्हणून राज्याचा टास्क फोर्स आग्रही आहे. उत्सवातील जल्लोषाचा भाग कमी झाल्याने काहींचा हिरमोड झाला असला, तरी कोरोना रुग्णांची तूर्तास आटोक्यात असलेली संख्या हा सगळ्यात मोठा दिलासा आहे. आज विसर्जनही तशाच शिस्तीने केले जाईल, याकडे गणेशोत्सव समन्वय समिती, स्थानिक प्रशासन यांचे लक्ष आहे.

कडेकोट बंदोबस्त

अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईसह राज्यात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व विसर्जन स्थळे, महत्त्वाची गर्दीची ठिकाणे आणि रेल्वे स्थानक परिसरात विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या दहशतवाद्यांच्या पार्श्वभूमीवर अतिदक्षतेचा इशारा देत विशेष खबरदारी घेतली जात आहे. तशा सूचना वरिष्ठांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिलेल्या आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

‘लोकमत’चे आवाहन

कोरोनाशी आपली लढाई अजून संपलेली नाही. कोरोना काळासाठी आपण तयार केलेली नियमावली काटेकोरपणे पाळली जावी. तसेच ‘सुरक्षित अंतर ठेवा, मास्क वापरा, गर्दी टाळा आणि हात स्वच्छ धुवा’ या सूत्राचे पालन सगळ्यांनी कसोशीने करावे, असे आवाहन आजच्या विसर्जनानिमित्ताने लोकमत राज्यातील तमाम गणेशभक्तांना करत आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून दुसरी लाट अशीच नियंत्रणात ठेवायची आणि तिसरी लाट येण्यापासून थोपवायची आहे, हे कायम स्मरणात राहू द्या, अशी ‘लोकमत’ची कळकळीची विनंती आहे.