मुंबई : २०२० मध्ये गणेशोत्सवात कोरोनाचा प्रकोप असल्याने सर्व मुंबईकरांनी गणेशोत्सव हा आरोग्य उत्सव म्हणून साजरा केला. यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने मुंबईत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आज अखेर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळदेखील आली.
कोरोनाच्या संकटात सलग दुसऱ्या वर्षीही गणपती बाप्पांचे आगमन झाले. गणेशभक्तांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. यंदा गणेशोत्सवात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सरकारने नियमावली जाहीर केली होती. या नियमावलीत दिल्याप्रमाणे कोरोनाचे सर्व नियम पाळून अगदी उत्साहात गणेशोत्सव पार पडला. दीड, पाच व सात दिवसांच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर आता अनंत चतुर्दशीला मुंबईतील सर्व मंडळांच्या व घरगुती गणपतींना निरोप देण्यात येणार आहे. बाप्पाला भावपूर्ण निरोप देत असताना “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या व कोरोनाला संपवून या,” असे गाऱ्हाणे भक्तांनी बाप्पाच्या चरणी घातले.
सरकारने गणेशोत्सवासाठी जारी केलेल्या नियमावलीमुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सवावर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंदा ऐनवेळी भक्तांना सार्वजनिक गणपतीच्या दर्शनास मनाई करण्यात आली. गणेशोत्सव मंडळांचा व भाविकांचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला. तरीदेखील सरकारच्या या निर्णयाला अनेक मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या वेळी गणेशोत्सवाच्या काळात सर्वांनी परिस्थितीचे भान राखले. आता बाप्पाला निरोप देताना पुढच्या वर्षी जगातून कोरोनाचे संकट नाहीसे होऊ दे व अधिक जल्लोषात गणेशोत्सव साजरा करता येऊ दे, अशी प्रार्थना सर्व भक्त बाप्पाजवळ करीत आहेत.