Join us  

समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 12:03 PM

Loksabha Election - ईशान्य मुंबई मतदारसंघात यंदा मविआचे संजय दिना पाटील आणि महायुतीचे मिहिर कोटेचा यांच्यात लढत पाहायला मिळत आहे. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. प्रचाराच्या या शेवटच्या टप्प्यात महायुती आणि मविआ यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. त्यात ईशान्य मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी मविआ उमेदवार संजय दिना पाटील यांना थेट खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. जनतेसमोर कुठल्याही व्यासपीठावर समोरासमोर या, तुम्ही तुमचे विचार आणि विकासाचा संकल्प सांगा, मी माझे विचार आणि माझे विकास संकल्प मांडतो असं आव्हान कोटेचा यांनी दिले आहे. 

मिहिर कोटेचा यांनी म्हटलं की, मोदी मुंबईत येणार या विचाराने उबाठाचे उमेदवार संजय दिना पाटील घाबरले आहेत, त्यामुळे एकेरी भाषेत ते पंतप्रधानांचा उल्लेख करतायेत. मी निवडून आल्यानंतर मानखुर्द विभागाचं नाव छत्रपती शिवाजी नगर करेन, शिवरायांच्या आशीर्वादाने झाकीर नाईकांच्या अवलादींचे ड्रग्स, मटका असे काळे धंदे बंद करेन आणि सुशासन आणेन असं त्यांनी म्हटलं. 

तर मुंबई प्रेस क्लबतर्फे शहराच्या विकासावर कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात विकासाबाबतची संकल्पना सादर करायची होती. परंतु आयोजकांनी तब्बल १५ वेळा संजय दिना पाटील यांना फोन केला, मात्र त्यांनी पळ काढला. एकदा नव्हे तर अनेकदा ते पळाले. त्यामुळे मी त्यांना आव्हान देतो, उत्तर पूर्व मतदारसंघातील विकासाबाबत आपली भूमिका मांडा, मी माझी भूमिका मांडतो, तुम्ही सांगाल तिथे जनतेसमोर, होऊ जाऊ द्या चर्चा असं म्हणत तुम्ही माझं आव्हान स्वीकारणार आणि तुमच्यावर लागलेला पळपुटेपणाचा आरोप पुसून काढणार असा खोचक टोलाही मिहिर कोटेचा यांनी संजय दिना पाटील यांना लगावला आहे.

मुंबईतील ६ मतदारसंघापैकी ४ मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी उमेदवार उतरवले आहेत तर २ जागांवर काँग्रेस लढत आहे. त्यातील ईशान्य मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी माजी खासदार संजय दिना पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे. त्याठिकाणी भाजपाकडून विद्यमान खासदार मनोज कोटक यांचं तिकीट कापून मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहेत. याठिकाणी कोटेचा आणि संजय दिना पाटील यांच्यात लढत होणार असून या मतदारसंघातील प्रचारसभेत दोन्हीही उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.  

टॅग्स :मुंबई उत्तर पूर्वमिहिर कोटेचासंजय दिना पाटीलभाजपालोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणुक रणांगण २०२४