मुंबई - देशभरातील हिंदूचं स्वप्न पूर्ण होऊन ५०० वर्षांचा वनवास संपुष्टात आला. २२ जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच मंगळवारी रामललाच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीचा नवा रेकॉर्ड बनला आहे. पहिल्याच दिवशीच मंदिरात ५ लाख भविकांनी दर्शन घेतले. अद्यापही अयोध्येत दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली असून मोठ्या प्रमाणात चारचाकी गाड्यात अयोध्येत येत आहेत. त्यातच, महाराष्ट्र सरकारचं अख्ख मंत्रिमंडळही लवकरच रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहे.
रामललाच्या दर्शनासाठी मंगळवारी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे, यामुळे प्रशासनाला सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याची गरज होती. यादरम्यान काही जणांना किरकोळ दुखापत झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वप्रथम लखनौ येथूनच लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, अयोध्येत दर्शनाला येण्यासाठी काही दिवसांनी यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनीही रामललच्या दर्शनासाठी थोडं थांबून या, असे आवाहन देशाताली रामभक्तांना केले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ५ फेब्रुवारी ही तारीख जवळपास निश्चित झाल्याचे समजते. त्यामुळे, अख्ख मंत्रिमंडळ घेऊन रामललाचे दर्शन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरू शकते. दरम्यान, २२ जानेवारी २०२३ रोजी रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही महाराष्ट्रातच होते. त्यामुळे, आता १० ते १२ दिवसांनी मुख्यमंत्री शिंदे हे उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमवेत अयोध्येला जाणार आहेत.
गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगींनी घेतला आढावा
रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत होणारी प्रचंड गर्दी पाहता येथे येणाऱ्या सर्व वाहनांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. भाविकांची ही गर्दी पाहता सीएम योगी यांनी स्वत: लखनऊ येथून लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे गर्दीची पाहणी केली. अयोध्येतील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन काही दिवस येथे येणाऱ्या सर्व वाहनांवर बंदी घालण्यात येणार आहे. गाड्यांसाठी केलेले सर्व ऑनलाइन बुकिंगही रद्द करण्यात आले असून, भाविकांच्या बसेसचे पैसे परत केले जाणार आहेत. रामललाच्या दर्शनासाठी भाविकांचा मोठा जमाव अयोध्येत पोहोचला तेव्हा प्रधान सचिव संजय प्रसाद आणि कायदा व सुव्यवस्था महासंचालक प्रशांत कुमार स्वतः गर्भगृहात उपस्थित होते. त्यांनी व्यवस्थेचा आढावा घेतला आहे.