Join us  

"जातीपातीच्या चिखलातून बाहेर या"; मनसेकडून राज ठाकरेंच्या 'त्या' व्यंगचित्राची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 8:29 PM

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हे व्यंगचित्र शेअर करण्यात आलं आहे

मुंबई - मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून राज्य सरकारनेही मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार, सध्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधून त्यांना जात प्रमाणपत्र दिलं जात आहे. त्यामुळे, कुणबी मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश होत आहे. यावरुन, ओबीसी नेतेही आक्रमक झाले असून मराठा आणि ओबीसी यांच्यातील दरी वाढत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जातीपातीच्या राजकारणाने महाराष्ट्र ढवळून निघत आहे. त्यावरुन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २७ जानेवारी २०१८ साली काढलेलं व्यंगचित्र आजच्या परिस्थितीच साक्ष देत आहे. 

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हे व्यंगचित्र शेअर करण्यात आलं आहे. त्यासोबतच, आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर महाराष्ट्रातील मराठी बांधवांना उद्देशून काय म्हणाले असते, असा मजकूर लिहिला आहे. या व्यंगचित्रात शिवाजी महाराज मराठी बांधवांना उद्देशून एक चांगला मेसेज देत आहेत. जातीपातीच्या चिखलातून बाहेर या.. असं शिवाजी महाराज सांगताना या व्यंगचित्रात दिसून येते. तसेच, मराठा आणि दलित एकमेकांसोबत भांडण आहेत आणि ब्राह्मणही बाजुलाच आहे. तर, चेहरा नसलेले जातीयवादी नेते एकत्र आहेत, असे ते व्यंगचित्र आहे. अरे, मी तुम्हा सर्वांना सोबत घेऊन मुघलांसोबत लढलो आणि तुम्ही एकमेकांविरुद्ध लढताय, का तर जातीयवादी नेत्यांच्या स्वार्थासाठी. या रे माझ्या लेकरांनो या चिखलातून बाहेर या... असे शिवाजी महाराज म्हणताना दिसत आहेत.

२७ जानेवारी २०१८ चं हे राजकीय व्यंगचित्र... महाराष्ट्रात आज जातीजातींमध्ये जी भांडणं लावली जात आहेत त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आज महाराष्ट्रातील मराठी बांधवांना उद्देशून काय म्हणाले असते तो विचार मांडण्याचा प्रयत्न राजसाहेबांनी ह्या व्यंगचित्रातून केला आहे. व्यंगचित्र पहा आणि विचार करा , असे ट्विट मनसेनं केलं आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही - राज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्दयांवर भाष्य केलं होतं. त्यावेळी, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन आणि मराठा आरक्षणावरही त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज ठाकरेंनी, मराठा समाजाल कुठलंही आरक्षण मिळणार नाही हे मी, जरांगे यांना आधीच सांगितलं होतं, असे म्हटलं. तसेच, जरांगेंच्या आंदोलनामागे नेमकं कोण आहे, त्याचा तपास करायला हवा, असेही त्यांनी म्हटले होते. त्यावर, जरांगे यांनीही प्रत्युत्तर देत राज ठाकरेंनीच याचा तपास करावा, माझ्या पाठिशी माझा समाज आहे, असे त्यांनी म्हटले.  

टॅग्स :राज ठाकरेमनसेमराठा आरक्षणछत्रपती शिवाजी महाराज