मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी खासदार संभाजीराजे राज्यव्यापी दौऱ्यावर असून, अनेक बड्या नेत्यांची ते भेट घेत आहेत. त्यातच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर संभाजीराजेंनी 6 जूनपर्यंतचा अल्टीमेटम सरकारला दिला आहे. त्यासाठी, 5 महत्त्वाच्या मागण्यांचं निवेदनही संभाजीराजेंनी दिलं आहे. आता, नाशिकमधील मराठा बांधवांना रायगडावर येण्याचं आवाहन संभाजीराजेंनी केलंय.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंनी अलीकडेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यानंतर संभाजीराजे सिंधुदुर्गात गेले आहेत. यावेळी संभाजीराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणावर ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तेव्हा आम्ही समंजसपणाची भूमिका घेतली होती. मराठा समाजाला संयम राखण्याचा सल्ला मी दिला होता. त्यामुळे राज्यात उद्रेक झाला नाही, असे संभाजीराजे म्हणाले होते. मात्र, 6 जूनपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा न काढल्यास रायगडावरुनच घोषणा होईल, असा इशाराच संभाजीराजेंनी दिला होता. आता, नाशिकमध्ये बोलताना, मिळेल ते वाहन पकडून राज्याभिषेक सोहळ्यादिवशी 6 जूनला रायगडावर येण्याचं आवाहन संभाजीराजेंनी मराठा बांधवांना केलंय.
सध्या कोरोनामुळे राज्यात जिल्हाबंदीचा नियम लागू आहे. काही जिल्ह्यात शिथिलता मिळत असली तरी, 15 जूनपर्यंत जिल्ह्याबाहेरील प्रवासासाठी बंदीच घालण्यात आली आहे. मात्र, मिळेल त्या वाहनाने रायगडावर या, असे आवाहन संभाजीराजेंनी नाशिकच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असताना सोमवारी संभाजीराजेंनी नाशिकच्या कार्यकर्त्यांनी ऑनलाईन संवाद साधला. तसेच, 2 जून रोजी नाशिकमध्ये बैठकीचेही आयोजन करण्यात आलंय. मराठा समाजाच्या पाच मागण्या मान्य कराव्या
मुख्यमंत्र्यांनी मला कोविड योद्धे म्हणून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. पण मी पूर्वीपासूनच समाजाचा योद्धा आहे. समाजासाठी लढत आलो आहे. कोविड योद्धा म्हणून मी बाहेर पडावं असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी मराठा समाजाच्या पाच मागण्या मान्य कराव्या. येत्या ६ जून रोजी मी माझी पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. त्याआधी त्यांनी निर्णय घ्यावा. राजकारण बाजूला ठेवावे आणि समाजाला न्याय द्यावा, असे आवाहन संभाजीराजेंनी केले आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यातून मार्ग काढतील
सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याची तारीख ४ जून आहे. सर्वोच्च न्यायालयाने ती वाढवली आहे. त्यामुळे अहवाल द्यायची तारीख सुद्धा पुढे गेली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढू असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे सांगितले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नक्कीच यातून मार्ग काढतील, असा विश्वास संभाजीराजेंनी यावेळी व्यक्त केला.