लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महानगरपालिकेच्या क्रीडांगण आणि उद्यानाच्या जागेवर अनधिकृतपणे कब्जा व बांधकाम करून ५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची शनिवारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून जवळपास ५ तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यांच्याविरोधात जर पुरावे मिळाले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
वायकर यांनी मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील व्यारवली गावातील जमिनीवर वायकरांनी २ लाख चौरस फुटांचे पंचतारांकित हॉटेल बांधण्यास सुरुवात केली असून त्याची किंमत ५०० कोटी रुपये इतकी आहे. वायकर यांनी ही जागा एका कंपनीकडून ताब्यात घेतली होती. बागेचे आरक्षण दाखवून चार कोटी रुपये रेडीरेकनर दराचा भूखंड ३ लाख रुपयांना खरेदी केला. त्यानंतर या भूखंडावरील ३३ टक्के जागेवर वायकर यांनी बँक्वेट बांधले. गेली अनेक वर्षे या जागेवर लग्न, पार्टी असे अनधिकृत व्यवहार सुरू असल्याचेही सोमय्या यांचे म्हणणे आहे.
सोमय्या यांच्या आरोपांवरुन प्राथमिक तपास सुरू करत वायकर यांना चाैकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यानुसार वायकर हे दुपारी सव्वाबाराच्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले.
माझी सत्याची बाजू आहेमला चाैकशीला हजर राहण्यासाठी नोटीस आल्यावर मी त्यांच्याकडे वेळ मागितला आणि आज चाैकशीला हजर राहिलो. मी सर्व गोष्टी कायद्याच्या कक्षेत राहून केल्या आहेत. मला आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जे प्रश्न विचारले त्याची उत्तरे दिली आहेत. माझ्यावर जाणूनबुजून आरोप केले जात असले तरी माझी सत्याची बाजू आहे. मी सर्व चाैकशीला सामोरे जाईन आणि मी नेहमी उद्धव ठाकरेंसोबत आहे, असेही वायकर यांनी सांगितले.