सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाची राज्य सरकारला विनंती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत जारी करण्यात आलेल्या नियमावलीत खासगी सुरक्षा कंपन्यांना अत्यावश्यक सेवेत सहभागी करण्यात आले आहे. त्यानुसार आता या फ्रंटलाईन वाॅरिअर्सना कोविडची लस देण्याची मागणीही पूर्ण करावी, अशी विनंती सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एसएआय) पदाधिकाऱ्यांनी केली.
राज्य सरकारने ५ एप्रिल, २०२१ रोजी जारी केलेल्या नियमावलीमध्ये खासगी सुरक्षारक्षकांना काम करण्याची परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत करीत त्यांचे आभार मानले. मात्र या कोविड योद्ध्यांच्या प्रकृतीचीही काळजी घेणे तितकेच आवश्यक असून त्यासाठी त्यांना लवकरात लवकर कोरोनाची लस द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे ‘एसएआय’ने केली. त्यासाठी त्यांनी यापूर्वी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनाही पत्र दिले होते. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यासाठी सहकार्य करावे, असे त्यांचे म्हणणे आहे.
सुरक्षारक्षक हे कंटेन्मेंट झोन, हॉटेल्स, रुग्णालय तसेच अनेक संवेदनशील ठिकाणी कार्यरत आहेत. जीव धोक्यात घालून ते ही सेवा बजावत असताना त्यांच्या कुटुंबीयांनाही यामुळे धोका उद्भवू शकतो. त्यामुळे सुरक्षारक्षकांनाही लवकरात लवकर ही लस मिळेल यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याबाबत निर्देश देण्यात यावेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
* सरकारकडून सहकार्याची अपेक्षा
आमच्या विनंतीला मान देऊन सरकारने सुरक्षारक्षकांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केले आहे. यासाठी आम्ही त्यांचे आभारी असून, सुरक्षारक्षकांना लस देण्याच्या आमच्या मागणीबाबतही सहकार्याची अपेक्षा आहे.
- गुरुचरणसिंह चौहान
अध्यक्ष, सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया
-------------------------