- मनोहर कुंभेजकर
मुंबई - पंजाबमध्ये उद्योगधंद्यांसाठी अत्यंत पोषक वातावरण असल्याने ज्या उद्योजकांना नवीन उद्योग सुरू करायचा असेल किंवा आपल्या उद्योगाचा विस्तार करायचा आहे, त्यांनी पंजाबमध्ये यावे असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे मुंबईतील व महाराष्ट्रातील उद्योजकांना केलेआहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. या दरम्यान त्यांनी मुंबईतील नामवंत उद्योजकांची भेट घेतली व त्यांना पंजाबमध्ये उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले.
भगवंत मान यांनी आज मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला भेट दिली, त्यावेळेस ते बोलत होते. या प्रसंगी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे सीईओ सुंदरारामन आर, आम आदमी पार्टी मुंबईच्या अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन, कार्याध्यक्ष रूबेन मस्करेन्हास, द्विजेंद्र तिवारी, एडमिरल राव, संदीप कटके व आम आदमी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पंजाबमध्ये आता जनतेचे सरकार आले आहे, आम आदमी पार्टीचे सरकार आले आहे. पंजाबमध्ये उद्योगधंदे उभारण्यासाठी अत्यंत पोषक वातावरण आम्ही तयार केलेले आहे. आम आदमी पार्टीचे सरकार असताना पंजाबमध्ये उद्योजकांना सिंगल विंडो क्लिअरन्स असणार आहे. परवानगीसाठी कोणतीही अडचण येणार नाही. मुंबई व महाराष्ट्रातील उद्योजकांना उत्तर भारतात आपला नवीन उद्योग सुरू करायचा आहे किंवा वाढवायचा आहे, त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. त्यांनी पंजाबमध्ये आपला उद्योग वाढवावा आणि येथील युवा वर्गाच्या हाती रोजगार द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मुंबई व महाराष्ट्रातील उद्योजकांना आवाहन केले.
भगवंत मान पुढे म्हणाले की, दि,२३ व दि, २४ फेब्रुवारी रोजी पंजाबमध्ये इन्व्हेस्ट पंजाब हे समिट आहे. देशभरातील उद्योजकांनी यामध्ये सहभागी व्हावे. आम्ही पंजाबमध्ये उद्योगधंद्यांना इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी दराने ५ रुपये प्रति युनिटच्या दराने वीज देतो. फक्त वीजच नाही तर इंडस्ट्रीज करिता पंजाबमधून स्वस्त दरात कोळसा सुद्धा उपलब्ध करून देतो. पंजाब सरकारच्या झारखंडमध्ये कोळशाच्या खाणी आहेत. तिथून इतका कोळसा काढला जातो की, आम्ही खाजगी कंपन्यांना सुद्धा तो स्वस्त दरात सप्लाय करू शकतो. त्यासाठी परवानगी घेण्यासाठी आमची कोळसा मंत्रालयाशी बोलणी सुरू आहेत. पंजाबमधील ८७ % घरांमध्ये शून्य वीज बील येते. पंजाबमध्ये सुपीक जमिनी आहेत. मेहनती लोक आहेत. योजनांची कमतरता नाही. दोन आंतरराष्ट्रीय आणि चार देशांतर्गत विमानतळ आहेत. रस्ते व महामार्गांची चांगली सुविधा आहे. इंडस्ट्रीज करिता येथे अत्यंत पोषक वातावरण आहे. उद्योजकांनी येथे येऊन आपला उद्योग वाढवावा आणि पंजाबमधील युवा वर्गाच्या हाती रोजगार द्यावा. पंजाबमधील युवा वर्गाच्या हातात ड्रग्ज ऐवजी, रोजगार पाहायचा आहे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.