पती हर्षवरही अटकेची टांगती तलवार : गांजा घेतल्याची दोघांची कबुली, घरासह कार्यालयावर छापा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) शनिवारी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध हास्य कलाकार भारती सिंहला अटक केली. तर तिचा पती हर्ष लिंबाचिया याची कसून चौकशी सुरू असून त्याला रात्री उशिरा अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एनसीबीने सकाळी त्यांच्या फ्लॅट व कार्यालयावर छापा टाकून ८६ ग्रॅम गांजा जप्त केला. दोघांनी गांजाचे सेवन करीत असल्याची कबुली दिल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कॉमेडियन भारती व तिच्यावरील कारवाईमुळे बॉलीवूड व छोट्या पडद्यावरील वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एनसीबीने ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी आतापर्यंत ३५ जणांना अटक केली आहे. यात अभिनेत्री रिया चक्रवर्तीनंतर भारती सिंहची अटक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. भारतीला वैद्यकीय तपासणीनंतर रात्री उशिरा किंवा रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टात हजर केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एनसीबीने शनिवारी सकाळी पश्चिम उपनगरातील खारदांडा परिसरात छापा टाकून एका २१ वर्षांच्या तस्कराला पकडले, त्याच्याकडून १५ ब्लॉट एलएसडी, ४० ग्रॅम गांजा व निट्रोसेपम औषध जप्त केले. त्याने भारती व तिच्या पतीला गांजा पुरविल्याचे सांगितल्यानंतर पथकाने तातडीने अंधेरीतील लोखंडवाला कॉप्लेक्समधील त्यांच्या फ्लॅटवर व वर्सोवा येथील कार्यालयात छापा टाकला. तेथे सुमारे सहा तास कसून झडती घेण्यात आली. त्यावेळी ८६.५ ग्रॅम गांजा सापडला. त्यानंतर दोघांना दुपारी तीनच्या सुमारास ताब्यात घेऊन एनसीबीच्या बेलार्ड पिअर येथील कार्यालयात आणले. त्यांच्याकडे सुमारे साडेतीन तास चौकशी करण्यात आली. दोघांनी गांजाचे सेवन केल्याची कबुली दिल्यानंतर भारतीला अटक करण्यात आली. हर्षची उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. अन्य दोन फरार तस्करांनाही अटक करण्यात आली आहे.
*भारतीवर लावलेले कलम
एनसीबीने कॉमेडियन भारतीवर एनडीपीएस कायदा १९८६ कलम ६६च्या तरतुदीनुसार अंमली पदार्थ बाळगणे व सेवन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तिचा पती हर्षवरही याच कलमांतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.