कॉमेडियन कुणाल कामरावर सहा महिन्यांची प्रवास बंदी, इंडिगोची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 02:16 AM2020-01-29T02:16:16+5:302020-01-29T02:16:33+5:30
प्रवाशांनी प्रवास करताना सहप्रवाशांसोबत वाद घालू नये, अशा प्रकरणामुळे सह प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागतो, अशी भूमिका इंडिगोतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई ते लखनऊ प्रवासात इंडिगोच्या विमानात पत्रकारासोबत आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामरावर इंडिगोने सहा महिने प्रवास बंदी घातली आहे. कामराने टिष्ट्वटरवर व्हिडीओ अपलोड केल्यानंतर ही घटना समोर आली होती.
कामरा याच्या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्यामध्ये कामरावर विमान प्रवास बंदी घालण्याची मागणीही अनेकांकडून करण्यात येत होती.
प्रवाशांनी प्रवास करताना सहप्रवाशांसोबत वाद घालू नये, अशा प्रकरणामुळे सह प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागतो, अशी भूमिका इंडिगोतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. हवाई वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांनी ही घटना अत्यंत चुकीची असून, यामुळे विमानात इतर प्रवाशांना त्रास होण्याची भीती असते, असे मत व्यक्त केले.
या प्रकरणी गुंतलेल्या व्यक्तीवर इतर कंपन्यांनीदेखील अशीच कारवाई करावी, असे टिष्ट्वटही पुरी त्यांनी केले आहे. या प्रकरणी कामरा याने इतर प्रवाशांना झालेल्या त्रासाबाबत प्रवाशांची माफी मागितली आहे.
मात्र, त्याचवेळी संबंधित पत्रकारासोबत त्याने केलेले वर्तन योग्य असल्याचे स्पष्टीकरणही कामराने दिले आहे.