Join us

‘त्या’ काळात ‘ती’ला दिलासा; २०० सॅनिटरी नॅपकिन मशीन कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 8:27 AM

स्वच्छतागृहांमध्ये २०० सॅनिटरी नॅपकिन मशीन कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : स्त्रियांच्या सुरक्षित आरोग्यासाठी सॅनिटरी पॅडचा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेकडून १३ प्रशासकीय विभागातील सार्वजनिक प्रसाधनगृह मिळून आतापर्यंत २०० मशिन्स कार्यरत केली आहेत. या मशीनमुळे सॅनिटरी पॅडची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत असल्याने ही मशिन्स पर्यावरणपूरक ठरत आहे. मशिन्स सुरू ठेवणे, त्यांची देखभाल करणे आणि त्यामध्ये नॅपकिनचा वेळोवेळी भरणा करण्याची कार्यवाही कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांमार्फत होत असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांनी दिली.

मासिक पाळी आरोग्य आणि स्वच्छता व्यवस्थापनासाठी, जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) स्वच्छता योजनेच्या निर्देशांप्रमाणे मुंबई पालिकेने प्रत्येक प्रभागात ‘कॉम्बो सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग - इन्सिनेरेटर मशीन’ बसविण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. सध्याच्या स्थितीत पालिकेची ३ हजार २५४, म्हाडाची ३ हजार ६५९ तसेच ‘पैसे द्या व वापरा’ तत्त्वावरील ७७२ आणि इतर ६०१ अशी एकूण ८ हजार २८६ सार्वजनिक प्रसाधनगृहे आहेत. त्यापैकी झोपडपट्ट्या आणि तत्सम वस्ती परिसरातील प्रसाधनगृहात ‘कॉम्बो सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग-इन्सिनेरेटर मशीन’ बसविण्याची कार्यवाही पालिकेकडून सुरू असल्याचेही जाधव यांनी सांगितले.  

आता झोपडपट्टींकडे लक्षझोपडपट्ट्यांमधील गरजू महिलांना माफक दरात सॅनिटरी पॅड्स उपलब्ध देणे आणि वापरलेल्या सॅनिटरी पॅड्सची योग्यरीत्या विल्हेवाट लावणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. स्वच्छतागृहात सॅनिटरी पॅड पुरवणे आणि वापरानंतर सॅनिटरी पॅडची योग्यरीत्या विल्हेवाट लावणे ही दोन्ही कार्य मशीनमधून होतात. 

घरगुती सॅनिटरी पॅड आणि डायपर हा वैद्यकीय कचरा मानला जातो. त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन खात्यातर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या कचऱ्याची विल्हेवाट स्वतंत्रपणे लावणे गरजेचे आहे. या प्रकल्पांमुळे पर्यावरणाचेही नुकसान टाळता येणार आहे.- चंदा जाधव, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, मुंबई पालिका 

टॅग्स :मुंबई