मुंबई : राज्यामध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने शनिवारी १० लाखांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात २३ हजार ६४४ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यभरात आतापर्यंत १० लाख १६ हजार ४५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
२४ आॅगस्ट ते २६ सप्टेंबर या काळात पाच लाख रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. आणखी सकारात्मक बाब म्हणजे राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येचे प्रमाणही घटले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या वाढली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ७६ टक्कयांच्या जवळपास पोहोचले आहे. राज्यात पहिला रुग्ण ९ मार्चला आढळून आला होता. त्यानंतर, २५ मार्चला पहिले दोन रुग्ण बरे झाले. त्यानंतरच्या सात महिन्यांत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत गेली.