दिलासा : नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 06:19 AM2020-08-03T06:19:09+5:302020-08-03T06:19:16+5:30
राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ४१ हजार २२८ झाली असून मृतांचा आकडा १५ हजार ५७६ आहे
मुंबई : राज्यात रविवारी पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात दिवसभरात ९ हजार ९२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ९ हजार ५०९ नवीन रुग्ण व २६० मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत २ लाख ७६ हजार ८०९ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६२.७४ टक्के आहे. सध्या १ लाख ४८ हजार ५३७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ४१ हजार २२८ झाली असून मृतांचा आकडा १५ हजार ५७६ आहे. मृत्यूदर ३.५३ टक्के एवढा झाला आहे.
१६,७६० बालकांना लागण राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या रविवारच्या सकाळच्या अहवालानुसार, राज्यात नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या १६ हजार ७६० बालकांना कोरोनाची लागण झाली आहे, या रुग्णांचे प्रमाण ३.९८ टक्के आहे. तर ३१ ते ४० वयोगटातील सर्वाधिक रुग्ण असून त्यांची संख्या ८७ हजार २४३ आहे, एकूण रुग्णसंख्येत या रुग्णांचे प्रमाण २०.७१ टक्के आहे.
देशात ५४,७३६ नवे रुग्ण
च्देशामध्ये पहिल्यांदाच एका दिवसात ५० हजारपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याची घटना रविवारी घडली. तर कोरोनाचे ५४,७३६ नवे रुग्ण आढळून आल्याने या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या आता १७ लाख ५० हजारांपेक्षा जास्त झाली आहे.
च्कोरोनामुळे आणखी ८५३ जण मरण पावले असून त्यामुळे एकूण बळींचा आकडा ३७,३६४वर गेला आहे. सध्या देशात कोरोनाच्या ५,६७,७३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण रुग्णांपैकी या आजारातून ६४.५३ टक्के जण पूर्णपणे बरे झाले आहेत तर रुग्णांचा मृत्यूदर अवघा २.१३ टक्के आहे.