मुंबई : मुंबईत दिवसभरात ४ हजार १९२ रुग्णांचे निदान झाले असून ८२ रुग्णांचा मत्यू ओढावला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे मागील २४ तासांत ५ हजार ६५० रुग्णांनी कोरोनाला हरविले असून आतापर्यंत ५ लाख ६६ हजार ५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ६४ हजार १८ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८८ टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७९ दिवसांवर गेला आहे. २२ ते २८ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.८६ टक्के असल्याची नोंद आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी दिवसभरात ३८ हजार ८४८ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ५३ लाख ८० हजार ४७३ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
शहर उपनगरातील झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेन्मेंट झोनची संख्या ११५ आहे. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या १ हजार १०१ इतकी आहे. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील २९ हजार ६१५ अतिजोखमीच्या सहवासीतांचा शोध घेतला आहे.
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढतोय
तारीखकालावधी (दिवस)
२९ एप्रिल ७९
२८ एप्रिल ७४
२७ एप्रिल ६८
२६ एप्रिल ६२
२५ एप्रिल ५८
२४ एप्रिल ५४
२३ एप्रिल ५२
२२ एप्रिल ५०
२१ एप्रिल ४८
सक्रिय रुग्णसंख्येतही मोठी घट
मुंबईत २१ एप्रिल रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ८४ हजार ७४३ असल्याची नोंद होती. त्यात घट होऊन २४ एप्रिल रोजी हे प्रमाण ७८ हजार ७७५ वर आले. २४ एप्रिलनंतर रुग्ण निदानाच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असलेली दिसून आली. परिणामी, उपचाराधीन रुग्णसंख्येचा आलेख उतरताना दिसून आला. २५ एप्रिल रोजी ७५ हजार ७५०, २६ एप्रिल रोजी ७० हजार ३७३ त्यानंतर २९ एप्रिल रोजी थेट आकडा ६५ हजारांच्या खाली गेल्याची नोंद झाली. सध्या मुंबईत ६४ हजार १८ सक्रिय रुग्ण आहेत.