दिलासादायक! राज्यासह मुंबईत रक्तसाठा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:25 AM2020-12-16T04:25:20+5:302020-12-16T04:25:20+5:30
राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मागील आठवड्यात राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यासह ...
राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील आठवड्यात राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यासह मुंबईत रक्तसाठ्याचा तुटवडा असल्याचे सांगितले होते. त्यानुसार, सर्व पातळ्यांवर रक्तदात्यांना रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही केले होते. या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून सध्या राज्यात दहा दिवस पुरेल इतका रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिली आहे.
राज्यासह मुंबईतही पुरेसा रक्तसाठा आहे. सध्या राज्यातील वेगवेगळ्या रक्तपेढ्यांमध्ये २९ हजार २२४ रक्त युनिट एवढा रक्तसाठा असून तो किमान पुढचे १० दिवस पुरेल, असेही सांगण्यात आले आहे. राज्यात ३४५ रक्तपेढ्या असून त्यातील जवळपास ३० ते ४० रक्तपेढ्यांनी माहिती अद्ययावत केलेली नाही, त्यामुळे रक्तसाठ्याची उपलब्धता अधिक असण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी दिली आहे.
राज्यात विविध ठिकाणी भरविण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने रक्तदाते सहभाग घेत आहेत. दरम्यान, मुंबईतही पुरेसा रक्तसाठा असून ३ हजार ८४० युनिट रक्त वेगवेगळ्या रक्तपेढ्यांमध्ये जमा आहे. शिवाय, दररोज रक्त शिबिरे भरविली जात असल्याने त्यात भर होत असल्याचेही डॉ. थोरात यांनी सांगितले आहे. राज्यासह मुंबईतील रक्तपेढ्यांमध्ये काही दिवसांपूर्वी फक्त एका दिवसाचा रक्तसाठा उपलब्ध होता. त्यानंतर, रक्तदानाचे आवाहन करीत अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे भरविण्यात आली आणि त्यातून हा रक्तसाठा जमा झाला आहे.