मुंबई : मुंबईत मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णांमध्ये घट दिसून आली आहे. मुंबईत सोमवारी ३ हजार ८७६ रुग्णांची नोंद झाली होती, तर मंगळवारी ४ हजार १४ रुग्ण आणि ५९ मृत्यू झाले आहेत. रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या अधिक असल्याने मुंबईकरांसह पालिकेसाठी ही सकारात्मक बाब आहे. शहर उपनगरात दिवसभरात ८ हजार २४० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ५ लाख ५५ हजार १०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ६६ हजार ४५ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८७ टक्के झाला असून, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६८ दिवसांवर आला आहे. २० ते २८ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.०१ टक्के असल्याची नोंद आहे. शहरात दिवसभरात ३० हजार ४२८ चाचण्या करण्यात आल्या असून, आतापर्यंत एकूण ५३ लाख २ हजार ४९० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
जी उत्तर वॉर्डातील दादर , माहीम आणि धारावी परिसरातील रुग्णसंख्येवर पालिकेचे विशेष लक्ष असून, या परिसरातील रुग्णदुपटीचा वेग जास्त दिवसांवर गेला असल्याचे दिसून येत आहे. मागच्या वर्षी या वॉर्डातील धारावीने सर्वाधिक चिंतेत लोटले होते. येथील रुग्ण दुपटीचा वेग तब्बल ११८ दिवसांवर गेला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
रुग्णांसह कोरोना चाचण्यांच्या दररोजच्या संख्येत घट
राज्यासह मुंबईत लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आता कोरोनाबाधित रुग्णसंख्येत मोठी घट दिसून येत आहे. गेले दोन दिवस बाधित रुग्णांची संख्या सरासरी चार हजारांवर आली आहे. मात्र या काळात मुंबईतील चाचण्यांमध्येही मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे रुग्णसंख्येतील ही घट कमी चाचण्यांमुळे असल्याचा तर्क व्यक्त होत आहे.
मार्च २०२० पासून आतापर्यंत ५३ लाखांहून अधिक लोकांची चाचणी करण्यात आली आहे. यापैकी २२ लाख चाचण्या गेल्या अडीच महिन्यांत करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रसार झपाट्याने वाढत असल्याने बाधित रुग्णांचा शोध लावून त्यांच्या जवळच्या संपर्कातील लोकांचे विलगीकरण करणे आवश्यक होते.
दररोज ५० हजार चाचण्या शक्य नसल्या तरी सरासरी ४० ते ४५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत दररोजच्या चाचणीचे प्रमाण कमी झाले आहे. मंगळवारी ३० हजार चाचण्या करण्यात आल्या असून ४०१४ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाची लक्षणे असलेले व्यक्ती चाचणीसाठी येण्याचे प्रमाण कमी झाल्याने गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत चाचण्यांचे प्रमाण कमी झाले असल्याचे पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.
तारीख चाचण्या रुग्णसंख्या२७ ३०,४२८ ४०१४२६ २८,३२८ ३८७६२५ ४०२९८ ५५४२२४ ३९,५८४ ५८८८२३ ४१,८२६ ७२२१२२ ४६८७४ ७४१०२१ ४७२७० ७६८४