मुंबई : मुंबईत मागील आठवडाभरात दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असल्याचे आढळून आले आहे. मुंबईत दिवसभरात २ हजार ६६२ रुग्ण आणि ७८ मृत्यूंची नोंद झाली आहे, तर दुसरीकडे नव्या रुग्णांच्या तुलनेत २४ तासांत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. दिवसभरात ५ हजार ७४६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडले असून, आतापर्यंत एकूण ५ लाख ८९ हजार ६१९ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे.
आता शहर उपनगरातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ६ लाख ५८ हजार ८६६ झाला असून, बळींचा आकडा १३ हजार ४०८ झाला आहे. सध्या ५४ हजार १४३ रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईत दिवसभरात २३ हजार ५४२ चाचण्या करण्यात आल्या, तर एकूण ५५ लाख १३ हजार ७८३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८९ टक्के असून, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १११ दिवसांवर पोहोचला आहे. २६ एप्रिल ते २ मे पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.६१ टक्के असल्याचे दिसून आले आहे. मुंबईतील झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात ९३ सक्रिय कंटेन्मेंट झोन्स असून, सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ८१४ आहे.
चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने घट
मुंबईत एप्रिलअखेरीसपासून दैनंदिन कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी केल्यामुळे रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत सोमवारी (३ मे) अवघ्या २३ हजार ५४२ चाचण्या केल्या असता २६६२ रुग्णांचे निदान झाले. यापूर्वी, मुंबईत २५ एप्रिल रोजी दिवसभरात ४० हजार २९८ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात ५५४२ रुग्ण आढळले होते. मात्र, यावर पालिका प्रशासनाने खुलासा करीत मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याने चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याचे सांगितले. मुंबईत एप्रिल महिन्याच्या मध्यावर १०० चाचण्यांमागे २५ ते २६ व्यक्ती बाधित असल्याचे दिसून येत होते, ते प्रमाण आता १२ ते १४ वर आले आहे.
दिवसदैनंदिन चाचण्या रुग्ण निदान
२६ एप्रिल २८३२८ ३८७६
२७ एप्रिल ३०४२८ ४०१४
२८ एप्रिल ३९१३५ ४९६६
२९ एप्रिल ३८८४८ ४१९२
३० एप्रिल ४३५२५ ३९२५
१ मे ३७६०७ ३९०८
२ मे २८६३६ ३६७२
३ मे २३५४२ २६६२