दिलासादायक! मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:06 AM2021-05-01T04:06:16+5:302021-05-01T04:06:16+5:30
मुंबई : मुंबईत बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट दिसून येत आहे. शुक्रवारी ३९२५ रुग्णांची नोंद झाली, तर त्याहून अधिक ...
मुंबई : मुंबईत बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट दिसून येत आहे. शुक्रवारी ३९२५ रुग्णांची नोंद झाली, तर त्याहून अधिक म्हणजे ६३८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत; परंतु एकीकडे रुग्णांची संख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. दिवसभरात ८९ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांचा आकडा आता १३ हजार १६१ झाला आहे. मात्र, रुग्णसंख्येत घट झाल्याने रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.७८ टक्के एवढा खाली आला आहे, तर ८७ दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट होत आहे.
आतापर्यंत मुंबईत सहा लाख ४८ हजार ६२४ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी पाच लाख ७२ हजार ४३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तसेच १३ हजार १६१ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या ६१ हजार ४३३ सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्या ८९ रुग्णांपैकी ४२ रुग्णांना सहव्याधी होत्या. मृतांमध्ये ५६ पुरुष, तर ३३ महिला रुग्णांचा समावेश होता. ५४ मृत रुग्ण ६० वर्षांवरील होते, तर ३२ रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते. ४० वर्षांखालील तीन रुग्णांचाही मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४३ हजार ५२५ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत ५४ लाख २३ हजार ९९८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ८८ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.