मुंबई - राज्यासह मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत कोरोना प्रसाराचा वेग कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. यात गेल्या २४ तासांत मुंबईत बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णापेक्षा कमी जवळपास दुप्पट असल्याचे दिसून आले. सध्या मुंबईत ४५ हजार ५३४ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मुंबईत नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ७९४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ३ हजार ५८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ६ लाख ७८ हजार २६९ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १३ हजार ८९१ जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख १६ हजार ९९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
दिवसभरात मृत्यू झालेल्या ६२ रुग्णांपैकी ५१ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. तसेच यामध्ये ४६ रुग्ण पुरुष आणि २८ रुग्ण महिला होत्या. ३ रुग्णांचे वय ४० वर्षाखाली होते, तर ४४ रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित २७ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते. मुंबईत दिवसभरात २३ हजार ०६१ कोरोनाच्या चाचण्या झाल्या असल्याने आत्तापर्यंत चाचण्यांची संख्या ५७ लाख ३३ हजार ४३१ वर पोहोचली आहे. ३ मे ते ९ मे २०२१ पर्यंत मुंबईतील एकूण कोरोना वाढीचा दर ०.४१ टक्के इतका असून दुप्पटीचा दर १६३ दिवसांवर आहे. मुंबईतील सक्रिय कंटेन्मेंट झोन ८७ आहेत, तर सक्रिय सीलबंदी इमारती ४९३ इतक्या आहेत.