दिलासादायक ! राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:07 AM2020-12-02T04:07:40+5:302020-12-02T04:07:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट येईल, या भीतीने आरोग्य विभागासह पालिका प्रशासनाने सर्व स्तरांवर तयारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट येईल, या भीतीने आरोग्य विभागासह पालिका प्रशासनाने सर्व स्तरांवर तयारी केली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनीही रुग्णसंख्या वाढेल अशी शक्यता वर्तविली होती; मात्र दुसरीकडे राज्यातील दैनंदिन रुग्ण निदान कमी झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.
राज्यात मंगळवारी काेराेनाच्या ३ हजार ८३७ रुग्णांचे निदान झाले असून ८० मृत्यू झाले आहेत. मागच्या काही महिन्यांत दिवसभरात १० ते १२ हजार रुग्ण आढळत होते. परंतु सकारात्मक बाब म्हणजे राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. यापूर्वी २९ नोव्हेंबर रोजी ५ हजार ५४४, २८ नोव्हेंबरला ५ हजार ९६५ आणि २७ नोव्हेंबरला ६ हजार ४०६ इतके रुग्ण आढळले होते. सामान्य नागरिकांसह आरोग्य यंत्रणांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या १८ लाख २३ हजार ८९६ झाली असून मृतांचा आकडा ४७ हजार १५१ झाला आहे. सध्या राज्यात ९० हजार ५५७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी काेराेनाचे ४ हजार १९६ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १६ लाख ८५ हजार १२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ३५ हजार ५३० व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ६ हजार ३५४ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८ लाख ५६ हजार ३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.०८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या ८० मृत्यूंमध्ये मुंबई १९, नवी मुंबई ४, कल्याण-डोंबिवली २, भिवंडी-निजामपूर १, नाशिक ४, नाशिक मनपा ३, मालेगाव १, जळगाव ३, जळगाव मनपा ३, पुणे २, पुणे मनपा १, पिंपरी-चिंचवड मनपा १, सोलापूर ५, सातारा १, रत्नागिरी २, जालना १, हिंगोली २, उस्मानाबाद १, बीड ३, बुलडाणा १, नागपूर ३, नागपूर मनपा ४, चंद्रपूर ७, चंद्रपूर मनपा ४, गडचिरोली १ आणि अन्य राज्ये व देशातील एक रुग्णाचा समावेश आहे.
चाैकट
कालावधी दैनंदिन रुग्णसंख्या
१ जून २ हजार २६१
१ जुलै ४ हजार ८७८
१ ऑगस्ट ९ हजार ६०१
१ सप्टेंबर १५ हजार ७६५
१ ऑक्टोबर १६ हजार ४७६
१ नोव्हेंबर ५ हजार ३६९