दिलासाजनक! मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या पाच हजारांच्या खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:06 AM2021-08-01T04:06:20+5:302021-08-01T04:06:20+5:30
मुंबई : एकीकडे मुंबईसह ठरावीक जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत, तर दुसरीकडे शहर उपनगरातील कोविडचा संसर्गही नियंत्रणात असल्याने ...
मुंबई : एकीकडे मुंबईसह ठरावीक जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत, तर दुसरीकडे शहर उपनगरातील कोविडचा संसर्गही नियंत्रणात असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या दोन लाटांवर नियंत्रण मिळविल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजारांच्या खाली आली आहे. सध्या शहर उपनगरात ४ हजार ९७२ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत सातत्याने रुग्ण निदानाच्या तुलनेत कोविडमुक्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. दिवसभरात ३४६ रुग्णांचे निदान आणि ९ मृत्यूंची नोंद झाली, तर ४४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण ७ लाख ११ हजार ५१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत ७ लाख ३४ हजार ७८१ कोरोनाचे रुग्ण असून १५ हजार ८८९ मृत्यू झाले आहेत.
शहर उपनगरात दिवसभरात ३४ हजार २०२ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. पालिकेने एकूण ८१ लाख ५२ हजार ६३९ चाचण्या केल्या आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के असून, रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १ हजार ४६५ दिवसांवर पोहोचला आहे. २४ ते ३० जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०५ टक्के आहे. मुंबईतील झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात ३ सक्रिय कंटेनमेंट झोन्स आहेत, तर ५२ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील २ हजार ७८ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.
चौकट
सक्रिय रुग्णांची विभागणी
लक्षणविरहित २०९२
लक्षणे असलेले २४५५
गंभीर ५३५