३० बाधितांचा मृत्यू; दिवसभरात १,२३९ जण कोरोनामुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा गेले काही दिवस कमी-अधिक होत असतानाच, शुक्रवारी ताे एक हजाराच्याही खाली गेला. दिवसभरात ९२९ रुग्ण आढळून आले. १ हजार २३९ रुग्ण काेराेनामुक्त झाले, तर ३० जणांचा मृत्यू झाला. मुंबईत गुरुवारी १,२६६ रुग्णांचे निदान झाले हाेते, तर काेराेनामुळे ३६ जणांना जीव गमवावा लागला हाेता.
मुंबईत सध्या २७ हजार ९५८ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. शुक्रवारी मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांपैकी १४ रुग्णांना दीर्घकालीन आजार हाेते. मृतांमध्ये १८ पुरुष आणि १२ महिला हाेत्या. मृतांमध्ये चाळिशीच्या आतील ६ रुग्ण, ६० वर्षांवरील १६, तर ४० ते ६० वयोगटादरम्यान ८ रुग्ण हाेते.
२१ मे ते २७ मेपर्यंतचा विचार केला असता मुंबईत रुग्ण वाढीचे प्रमाण ०.१८ टक्के आहे. सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९४ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ३७० दिवसांवर आला आहे.
दरम्यान, सध्या संपूर्ण मुंबईत १७५ इमारती सीलबंद असून, झोपडपट्टी व चाळींमध्ये ४१ सक्रिय कंटेनमेंट झोन्स आहेत.
.....................................