दिलासादायक! राज्यासह आता मुंबईतही निर्बंध शिथिल; रात्रीची संचारबंदी हटवण्याचा घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 09:26 AM2022-02-02T09:26:12+5:302022-02-02T10:37:22+5:30
ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला.
मुंबई : मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे. शहर उपनगरात मंगळवारी ८०३ रुग्णांची नोंद झाली, तर ७ मृत्यू झाले आहेत. सध्या ८,८८८ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती पालिकेने दिली आहे. तसेच याचपार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांना आता काहिसा दिलासा मिळाला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दिली आहे.
ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. मुंबईतील रुग्णसंख्या दोन दिवसापासून हजाराच्या आत आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या आता नियंत्रणात आल्याने मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. लग्नसोहळे आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २०० लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
नव्या निर्णयानुसार खालील गोष्टी क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू होणार-
१. समुद्र किनारे
२. गार्डन
३. पार्क
४. जलतरण तलाव
५. वॉटर पार्क
६. थिम पार्क
७. हॉटेल
८. रेस्टॉरंट
दरम्यान, मुंबईत दिवसभरात १८०० रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत १०,१९,०८८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. २५ ते ३१ जानेवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.१४ टक्के आहे. दिवसभरातील रुग्णांपैकी ६५० रुग्ण लक्षणविरहित आहेत. मुंबईत एकूण १०,४७,३९३ कोरोनाबाधित असून, मृताचा आकडा १६,६३० इतका आहे.
पालिकेने रुग्णांचा शोध घेण्यासाठी २४ तासात ५१,४९२ चाचण्या केल्या असून, एकूण १,५३,४०,९३३ कोरोना चाचण्या केल्या आहेत. शहर उपनगरात सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या पाच आहे. मागील २४ तासात रुग्णांच्या संपर्कातील ६,७४२ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.