दिलासादायक! वरळी, लोअर परळमध्ये १४ दिवसांत रुग्ण नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 01:38 AM2020-04-27T01:38:49+5:302020-04-27T01:39:04+5:30

गेले काही दिवस या परिसरात मुंबई महापालिकेने काही निर्बंध आणि उपाययोजना राबविल्यामुळे येथील ५१ पैकी १९ बाधित क्षेत्रे अखेर रद्द करण्यात आली आहेत.

Comfortable! Worli, Lower Parel has no patient in 14 days | दिलासादायक! वरळी, लोअर परळमध्ये १४ दिवसांत रुग्ण नाही

दिलासादायक! वरळी, लोअर परळमध्ये १४ दिवसांत रुग्ण नाही

Next

मुंबई : कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या वरळी, लोअर परळ भागात अखेर रुग्णांची संख्या आता ६००हून अधिक झाली आहे. यामुळे या परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र या तणावाच्या काळातही एक आशेचा किरण दिसू लागला आहे. गेले काही दिवस या परिसरात मुंबई महापालिकेने काही निर्बंध आणि उपाययोजना राबविल्यामुळे येथील ५१ पैकी १९ बाधित क्षेत्रे अखेर रद्द करण्यात आली आहेत. या भागांमध्ये गेल्या १४ दिवसांच्या काळात एकही नवीन रुग्ण न सापडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता पाच हजार ४०० पर्यंत पोहोचली आहे. तर २०४ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा पहिला रुग्णही वरळीमध्येच सापडला होता. तेव्हापासून जी दक्षिण विभागातील वरळी, प्रभादेवी, लोअर परळ हे परिसर हॉटस्पॉट ठरले आहेत. रविवारी या विभागातील रुग्णांचा आकडा सहाशेहून अधिक झाला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. या विभागात रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिकेने गेले काही दिवस कडक पावले उचलली होती.
>अशा केल्या उपाययोजना
वरळी, लोअर परळ परिसरात कोरोना रोखण्यासाठी संशयित रुग्णांना शोधून त्यांचे प्रभावी क्वारंटाइन, रुग्ण सापडलेल्या ठिकाणी निर्जंतुकीकरण तसेच रुग्णांवर चांगले उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे आतापर्यंत १२५ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. अद्यापही बाधित क्षेत्र तसेच रुग्ण न सापडलेल्या ठिकाणीही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, संशयितांची तपासणी सुरू आहे. क्वारंटाइनचे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत.
>हे बाधित क्षेत्र झाले मुक्त
लोढा वर्ल्ड टॉवर, आनंद छाया बिल्डिंग, सतीआकार सोसायटी, सिद्धिप्रभा बिल्ंिडग, उत्कर्ष बिल्ंिडग, विरा हाउस बिल्ंिडग, शिवकृपा बिल्ंिडग, विष्णू ज्योती सदन, लोखंडवाला रेसिडेन्सी टॉवर, जरीमरी सोसायटी हे भाग बाधित क्षेत्रातून रद्द करण्यात आले आहेत. तसेच गेल्या १४ दिवसांपासून रुग्ण न आढळलेल्या इमारतींनाही बाधित क्षेत्रातून वगळण्यात आल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Comfortable! Worli, Lower Parel has no patient in 14 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.