Join us

दिलासादायक; मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या सात हजारांवरून पाच हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 4:06 AM

दिवसभरात ५ हजार ८८८ नवे रुग्ण; ८ हजार ५४९ झाले काेराेनामुक्तलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत ...

दिवसभरात ५ हजार ८८८ नवे रुग्ण; ८ हजार ५४९ झाले काेराेनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट झाली असून सात हजारांवरून ही संख्या पाच हजारांच्या टप्प्यात आली आहे. तर दुसरीकडे मागील २४ तासांत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही अधिक असल्याची माहिती पालिकेने दिली. मुंबईत शनिवारी ५ हजार ८८८ रुग्णांचे निदान झाले असून ७१ मृत्यूंची नोंद झाली. तर शुक्रवारी ७ हजार २२१ रुग्ण आणि ७२ मृत्यूंची नोंद झाली होती. शहर, उपनगरात शनिवारी ८ हजार ५४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ५ लाख २९ हजार २३३ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत.

मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ६ लाख २२ हजार १०९ इतकी झाली आहे. तर मुंबईत आतापर्यंत १२ हजार ७१९ जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. मुंबईत १७ एप्रिल ते २३ एप्रिलपर्यंतचा विचार केल्यास कोरोना रुग्णवाढीचा दर हा १.२६ टक्के इतका आहे. मुंबईतील रुग्णसंख्या वाढू लागल्याने मुंबईतील कोरोना चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. मुंबईत दिवसभरात ३९ हजार ५८४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत एकूण ५२ लाख ३ हजार ४३६ कोरोना चाचण्या पालिकेने केल्या आहेत.

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८५ टक्के आहे. सध्या झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात १२२ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर १ हजार २११ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील २४ हजार ९१७ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे.

दैनंदिन रुग्णांची आकडेवारी

२४ एप्रिल ५,८८८

२३ एप्रिल ७,२२१

२२ एप्रिल ७,४१०

२१ एप्रिल ७,६८४

.................................

२० एप्रिल ७२१४

चार महिन्यांत १०१ मृत्यू

पालिकेच्या माहितीनुसार, २१ जानेवारी २०२१ ला १० मृत्यू नोंदविण्यात आले होते. २१ फेब्रुवारीला फक्त ६ मृत्यू नोंदवण्यात आले होते. त्यानंतर २१ मार्चला १० मृत्यूंची नोंद होती. पण २१ एप्रिल या दिवशी ही संख्या सातपटीने वाढून ७५ वर पोहोचली. चार महिन्यांत मुंबईत १०१ मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या मुंबईत १२ हजार ७१९ मृत्यूंची नोंद झालेली आहे. दरम्यान, अजूनही मुंबईचा मृत्युदर २ असल्याचे पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. हा मृत्युदर पहिल्या लाटेदरम्यान ५.८ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. मुंबईचा एकूण कोविड मृत्युदर दोन टक्के आहे.