दिलासादायक; मुंबईत दीड लाख लसींचा साठा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:05 AM2021-04-26T04:05:47+5:302021-04-26T04:05:47+5:30
ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत; पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील ...
ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत; पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील लसीकरण केंद्रावरील लसींचा साठा संपत असल्याने लसीकरणाला अडथळा येत आहे. मात्र लसीकरण पूर्वपदावर यावे म्हणून मुंबई महापालिका सातत्याने प्रयत्न करत असून, रविवारी कोविशिल्ड लसींचा सुमारे दीड लाख एवढा साठा आला आहे. परिणामी सोमवारपासून सर्व लसीकरण केंद्र पुन्हा एकदा कार्यान्वित होतील, असा दावा मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केला, तर दुसऱ्या डोससाठीचा कोव्हॅक्सिन लसींचा साठा मात्र ठराविक लसीकरण केंद्रांवर मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
कोरोना रुग्णांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याची वेळ मुंबई महापालिकेवर यापूर्वी आली होती. मात्र आता ऑक्सिजनच्या पुरवठ्याशी निगडीत सर्व समस्या निकाली निघाल्या आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा सर्वसाधारण स्थितीत सुरू आहे, असे आयुक्तांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबतची माहिती देताना सांगितले.
मुंबई व महाराष्ट्रसह संपूर्ण देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कोरोनाबाधितांना वैद्यकीय उपचार देताना प्राणवायू अर्थात ऑक्सिजन पुरविण्याची गरज स्वाभाविकच वाढली आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा साठा पुरेसा उपलब्ध राहील, विशेषतः काेराेबाधितांना प्राणवायूअभावी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासन अतिशय सतर्क आहे. इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाने प्रशासनाने अन्न व औषध प्रशासन तसेच प्राणवायू पुरवठादारांशी समन्वय राखण्यासाठी सहा समन्वय अधिकाऱ्यांची २४ तास नियुक्ती करण्यात आली आहे. नेमलेली पथके प्राणवायूचे उत्पादन ते वितरण होईपर्यंतच्या साखळीवर लक्ष ठेवून आहेत. मुंबईतील रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा साठा व्यवस्थित आणि वेळेवर पोहोचतो आहे. प्राणवायूचा वापर योग्यरीत्या आणि काटकसरीने होतो आहे, यावर महानगरपालिका प्रशासन लक्ष ठेवून आहे. तातडीच्या प्रसंगासाठी प्राणवायू उत्पादकांना लागलीच सूचित करून तत्परतेने प्राणवायू पोहोचविण्याची कार्यवाही केली जात आहे.
* प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे रुग्ण सुरक्षित
- घाटकोपर येथील एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू महासभा या खासगी रुग्णालयात काेराेनाबाधितांसाठी ऑक्सिजनच्या साठ्याची कमतरता जाणवत असल्याची माहिती प्राप्त होताच प्रशासनाने तातडीने या रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा पोहोचवला होता. यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेले सर्व ६० रुग्ण सुरक्षित होते.
- महापालिकेच्या सहा रुग्णालयांमधील १६८ रुग्णांचे ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या इतर काेराेना रुग्णालय किंवा काेराेना केंद्रांमध्ये सुरक्षितरीत्या स्थलांतर करण्यात आले होते.
..............................................