मुंबई : शिक्षणापासून वंचित राहिलेल्या व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून दूर गेलेल्यांना पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना गेल्या वर्षी जुलैमध्ये झाली. आता विभागाने महाराष्ट्र मुक्त विद्यालय मंडळाबाबत शुक्रवारी सुधारित कार्यप्रणाली प्रसिद्ध केली असून त्यानुसार येत्या नवीन शैक्षणिक वर्षांत म्हणजेच जूनमध्ये याची पहिली परीक्षा होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिव सुवर्णा खरात यांनी दिली.प्राथमिक स्तर (पाचवी समकक्ष) आणि उच्च प्राथमिक स्तर (आठवी समकक्ष) या दोन स्तरांसाठी सुरुवातीला ही परीक्षा घेण्यात येणार असून त्यासाठी येत्या महिन्याभरात कार्यवाही सुरू केली जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली.या मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना राज्य मंडळाच्या परीक्षांची समकक्षता देण्यात आली आहे. महाराष्ट्र मुक्त विद्यालय मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्णतेची समकक्षता दिली आहे. ही समकक्षता राज्य सरकारच्या उच्च शिक्षण व रोजगाराच्या संधींसाठी लागू राहणार असल्याने त्यामुळे आता मुक्त शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय हे राज्य मंडळाचाच एक भाग म्हणून कार्यान्वित राहणार असून राज्य मंडळाकडे असणारे मनुष्यबळ, भौतिक सुविधा व उपलब्ध निधी यांच्या आधारे ते चालविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. नोंदणी शुल्कामुळे प्राप्त होणाºया निधीतून भविष्यात हे मंडळ आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे याचा आर्थिक बोजा किंवा वेगळी जबाबदारी राज्य शासनावर येणार नसल्याचे शासन निर्णयातून स्पष्ट करण्यात आले आहे.सध्या ५वी आणि ८वीच्या अभ्यासक्रमावर काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होणार असल्याची माहिती खरात यांनी दिली. मुक्त विद्यालय मंडळाशी संलग्नित असणाºया मुक्त विद्यालय केंद्रांमध्ये विद्या प्राधिकरण आणि बालभारतीने तयार केलेल्या पाठ्यपुस्तकांसोबतच ‘नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क’ने तयार केलेल्या पुस्तकांमधील अभ्यासक्रम राहणार आहे.इयत्ता दहावीत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण पाच विषयांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. विद्यार्थ्याला पुढील शाखेत म्हणजेच अकरावी आणि बारावीत विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा असल्यास त्याला दहावीत इंग्रजी, विज्ञान आणि गणित या विषयांत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
येत्या शैक्षणिक वर्षांत मुक्त विद्यालयाची परीक्षा होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 3:37 AM