मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ सोडून शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत मोठे भगदाड पडणार आहे.
दरम्यान, सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावेळी सध्याचे वरळी मतदारसंघातील शिवसेना आमदार सुनील शिंदेही उपस्थित होते. यावेळी वरळी मतदारसंघासाठी शिवसेनेकडून सचिन अहिर यांना उमेदवारी दिली तर तुम्ही काय करणार? असा प्रश्न सुनील शिंदे यांना पत्रकारांनी विचारला. यावेळी आगामी काळात मीच वरळीचा आमदार असेन, असे सुनील शिंदे यांनी सांगितले. तसेच, सामान्य शिवसैनिकाप्रमाणे या ठिकाणी आलो आहे. मात्र, पक्षप्रमुख जो आदेश देतील, तो पक्षाच्या हिताचा असेल, असेही सुनील शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'शिवसेना वाढवण्याचे काम मी करणार आहे. आम्हाला पक्ष फोडायचा नाही, तर पक्ष वाढवायचा आहे. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत मला असंख्य कार्यकर्त्यांचा फोन येत आहे.' तसेच, कोणत्या जागेवरून कोणाला लढवले पाहिजे हा निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत, असेही सचिन अहिर यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून सुनील शिंदे यांनी सचिन अहिर यांचा पराभव केला होता. मात्र, आता सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा सुनील शिंदे यांना उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. तर, दुसरीकडे सचिन अहिर यांनी वरळीऐवजी भायखळा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.