Join us

निवडणुका येताच 'कृष्णकुंज'वर कार्यकर्त्यांची गर्दी; ठाणे, पालघरमधून अनेकांचा मनसेत प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 5:33 PM

ठाणे पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.

मुंबई - विधानसभा निवडणूक लढविणार की नाही या संभ्रमात असणाऱ्या मनसेकडून निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचे संकेत मिळाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना, बहुजन विकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. वसई,बोईसर,पालघर,वाडा,विक्रम गड,तलासरी,डाहणू,जव्हार याठिकाणचे इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजबाहेर प्रचंड गर्दी केली होती. 

ठाणे पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. कल्याणचे दबंग पोलीस अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले जगदिश लोहळकर यांनी जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वाखाली मनसेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख केळगण कामतवाडीचे अनिल राणावडे यांनीही मनसेचा झेंडा हाती घेतला. 

विधानसभा निवडणुकीत मनसेकडून १२० ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याची माहिती आहे. तसेच शिवसेना-भाजपा युती झाल्यास यातील अनेक बंडखोर मनसे नेत्यांच्या संपर्कात आहे. युतीकडून उमेदवारी नाकारली गेल्यास ते मनसेच्या इंजिनाचा आधार घेऊन विधानसभा निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे मनसेच्या उमेदवारांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी राज ठाकरे यांनी मनसेच्या इच्छुक उमेदवारांचा मेळावा आयोजित केला आहे. ईडीच्या चौकशीनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रम घेत असल्याने मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, भाजपा नेते आशिष शेलार यांना एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत राज ठाकरे शांत बसलेत असं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला, त्याला उत्तर देताना आशिष शेलार यांनीही राज ठाकरेंचा व्यक्तिगत स्वभाव पाहता ते शांत बसणाऱ्यांपैकी नाहीत असं सांगत एकप्रकारे राज ठाकरे पुन्हा भाजपाला टीकेचं लक्ष्य करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यापूर्वी भाजपाने सोशल मीडियावरुनही राज ठाकरेंना चिमटे काढले आहेत. त्याला मनसेच्या अधिकृत ट्विटरवरुनही जशास तसे उत्तर देण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेने आपला जोर लावल्याचं पाहायला मिळत आहे.  

टॅग्स :मनसेशिवसेनामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ठाणेपालघर