मुंबई : एकीकडे गेल्या वर्षात आलेली चार चक्रीवादळे आणि नंतर कोविड मुळे मच्छिमारांचा व्यवसाय डबगाईला आला आहे.त्यातच राज्य शासनाकडून राज्यातील कोट्यवधी रुपयांचा डीझेल परतावा हा मच्छिमारांना मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे.त्यामुळे मच्छिमारांना डिझेल परतावा लवकर द्या अशी आग्रही मागणी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विधान परिषद आमदार रमेश पाटील, वर्सोवाच्या स्थानिक आमदार डॉ भारती लव्हेकर यांनी आपल्या भाषणात केली होती. त्यांच्या भाषणाचा धागा पकडून आगामी काळात डीझेल परताव्याचा बॅकलॉग भरून काढत सदर परतावा शून्य करणार असल्याचे ठोस आश्वासन राज्याचे मत्स्यव्यवसाय,वस्त्रोद्योग व बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी काल रात्री वेसावे कोळीवाडयात दिले.
वेसावा मच्छीमार सहकारी सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आता अमृतमहोत्सवी संस्थेने समाजातील सामाजिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी सुसज्ज व वातानुकुलीत असे सांस्कृतिक भवन निर्माण केले आहे. वेसावे,चर्च रोड येथील संस्थेच्या आवारात उभारलेल्या या सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन काल रात्री असलम शेख यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रमेश पाटील, स्थानिक आमदार डॉ भारती लव्हेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे विद्यमान अध्यक्ष महेंद्र लडगे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला मान्यवरांचे स्वागत संस्थेचे माजी अध्यक्ष राजहंस टपके यांनी केले.तर उपाध्यक्ष प्रमोद भानजी आणि कार्यकारी संचालक विक्रांत चिखले आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अस्लम शेख पुढे म्हणाले की,गेल्या 74 वर्षात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या या संस्थेने वेसाव्यात सुसज्ज सांस्कृतिक भवन उभे करून यासंस्थेने एक इतिहास रचला आहे.मी मालाड विधानसभा मतदार संघात सलग तीनदा आमदार म्हणून निवडून आलो असून माझ्या विजयात येथील कोळी बांधवांचा सिहांचा वाटा आहे.मच्छिमारांच्या समस्या सोडवण्यासाठी टास्क फोर्स नेमणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कोळी समाजाचे प्रश्न मला चांगलेच अवगत असून येत्या 10 दिवसात कोळीवाडे व गावठनांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात संबंधीतांची बैठक बोलावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डीपी,गुगल मॅप मध्ये कोळीवाड्यांच्या सीमांकनाबद्धल काही जरी निर्देशित केले असले तरी,कोळी सामाजाची एक इंचही जागा मी जाऊ देणार नाही असे ठोस आश्वासन त्यांनी दिले.
मच्छिमारांना गेल्या काही वर्षात मासळी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.पर्सिसन नेट व एलईडी लाईट मासेमारीला आळा घालण्यासाठी शासनलवकरच कडक कायदा करणार आहे.तर आपल्या राज्यात मासेमारी करणाऱ्या परराज्यातील मच्छिमार बोटींवर करडी नजर ठेवण्यासाठी स्पीड बोटींमध्ये सुधारणार करणार असल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले.
सरकारकडे पैसा असो वा नसो, गेल्या 20 वर्षामध्ये मच्छिमारांच्या सर्वांगिण विकासाची जी कामे झाले नाही,ती आपल्या कारकिर्दीत पूर्ण करून आपल्या कामाचा मत्स्यव्यवसाय मंत्री म्हणून ठसा उमटवणार असल्याचे ठोस आश्वासन त्यांनी शेवटी दिले.
आमदार डॉ. लव्हेकर आपल्या भाषणात म्हणाल्या की,वेसावकरांचा 23 महिन्यांचा 14 कोटी 57 लाख 68 हजार डिझेल परतावा बाकी आहे,तो येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी देण्यात यावा. सीमांकनात सावळा गोंधळ असून कुठे गायब झाल्या भूमीपूत्रांच्या वाहिवाटीच्या व मासळी सुकवण्याच्या जागा असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे सीमांकनाच्या हरकतीची मुदत 30 ऑक्टोबरला संपली असून ती मुदत वाढवून द्यावी तसेच मुंबईत सुसज्ज कोळी भवन बांधा अशी मागणी त्यांनी केली.
आमदार रमेश पाटील म्हणाले की,मुंबईतील 42 कोळी वाड्यांपैकी उपनगरातील 13 कोळीवाड्यांचे सीमांकन झाले आहे,तर उर्वरित 29 कोळीवाड्यांचे सीमांकन कधी करणार असा सवाल आमदार रमेश पाटील यांनी केला. डिझेल परताव्यासाठी 176 कोटींची तरतूद असतांना,शासनाने फक्त 19 कोटी रुपये मच्छिमारांना दिले. आता सदर परताव्याची रक्कम 208 कोटींवर गेली असून मंत्रीमहोदयांनी याकडे जातीने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली.चक्रीवादळ व कोविड मुळे मच्छिमारांचे कंबरडे मोडले आहे.1500 कोटी रुपयांच्या पॅकेजची गरज असतांना शासनाने फक्त 65 कोटींचे पॅकेज दिले याकडे त्यांनी लक्ष वेधले.
संस्थेचे अध्यक्ष महेंद्र लडगे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,वेसावकरांसाठी सांस्कृतिक भवनाची गरज होती ती सर्वांच्या सहकार्यानेआमच्या संस्थेने कोविड सारख्या कठीण परिस्थितीत पूर्ण केली. या सांस्कृतिक भवनाला सुमारे 4.25 कोटी रुपये खर्च आला असतांना आमच्या सभासदांनी 1.25 कोटी रुपये ठेवींच्या रुपात दिले.
प्रारंभी स्वागताध्यक्ष राजहंस टपके म्हणाले की संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. 1946 साली स्थापन झालेल्या या संस्थेची वेसावे-मढ फेरीबोट सेवा गेली 60 वर्षे रोज पहाटे ते मध्यरात्री पर्यंत सुरू असते. तसेच संस्थेची मासळी वाहतूक सेवा असून आणि नवी मुंबई महापे येथे संस्थेचा आद्यवत बर्फ कारखाना गेली 8 वर्षे सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मच्छिमार सेलचे मुंबई अध्यक्ष प्रदीप टपके यांनी मच्छिमारांच्या समस्या मांडल्या.