मुंबई : मध्य रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ४0 स्पेशल कमांडो रेल्वे सुरक्षा दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर हे कमांडो तैनात केले जातील, अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली. शस्त्रात्रे, बॉम्ब हाताळण्यापासून ते दहशतवाद्यांशी लढा देण्याचे प्रशिक्षण या कमांडोंना देण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पश्चिम व मध्य उपनगरीय रेल्वे मार्गावरील स्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था अधिक चोख करण्यात आली. अशा प्रकारच्या हल्ल्याला रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वेचे विशेष कमांडो पथक स्थापन केले त्यानुसार कमांडोंच्या दोन कंपनी मुंबईला देण्याचा निर्णय घेतला. २00 स्पेशल कमांडोंची नियुक्ती मध्य रेल्वेच्या स्थानकांवर करणार आहेत.या ४0 कमांडोंचे प्रशिक्षण पुण्यात पूर्ण झाल्यानंतर सोमवारपासून ते मुंबई मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होतील. या कमांडोंनी फोर्स वन प्रमाणे दोन महिन्यांचे कठोर प्रशिक्षण घेतल्याचे मध्य रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी सांगितले.या ४0 जणांची नियुक्ती दादर, ठाणे, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण अशा ठिकाणी करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या स्थानकांवर कमांडो
By admin | Published: April 18, 2016 2:00 AM